केळघर -मेढा-महाबळेश्वर मार्गावरील केळघर (ता. जावळी) गावच्या प्रवेशद्वारावर असणारा गुलमोहराचा महाकाय वृक्ष हा पडण्याची शक्यता असल्याने संबंधित विभागाने हे झाड तातडीने काढवी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या धोकादायक वृक्षामुळे एकप्रकारचे संकटच घोंगावत असल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.
केळघर गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला वीज वितरण कंपनीच्या सार्वजनिक डीपीजवळ गुलामोहराचे महाकाय झाड हे सध्या धोकादायक परिस्थितीत उभे आहे. मुळ्या कमकुवत झाल्याने हे महाकाय झाड पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वेळेत झाड न हटवल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
या झाडाच्या दोन्ही बाजूने सतत वाहतूक सुरू असते. तसेच दोन्ही बाजूनी नाले असल्याने व पाणी वाहून जाणारी मोरी गाळाने भरल्याने येथे दलदल निर्माण झाली आहे.झाडाच्या मुळ्या कमकुवत झाल्या आहेत. नुकत्याच वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे, खांब पडल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. सध्या हे झाडदेखील पडण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून पावसाळ्याच्या दिवसात झाड पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच या परिसरात घरेदेखील आहेत, त्यामुळे जीवित तसेच वित्तहानी होऊ शकते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच हे धोकादायक झाड काढले जावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
केळघरच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हा महाकाय वृक्ष असून हा वृक्ष पावसाळ्यापूर्वी न काढल्यास मोठी दुर्घटना घडू शकते, या वृक्षाखाली विद्युत ट्रान्सफॉर्मर असून पावसाळ्यात हे झाड पडल्यास मोठी हानी होण्याबरोबरच ही दुर्घटना एखाद्याच्या जीवावरही बेतू शकते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने हे धोकादायक झाड काढावे.
रवीद्र सल्लक,सरपंच केळघर.