Sara Duterte : फिलीपीन्सच्या उपाध्यक्षांविरोधात गुन्हेगारी तक्रार दाखल

मनिला : फिलीपीन्सच्या उपाध्यक्षा सारा दुतेर्ते आणि त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांविरुद्ध अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केल्याचा आणि काँग्रेसमधील नुकत्याच झालेल्या भांडणात आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी फौजदारी तक्रारी दाखल केल्या आहेत. दुतेर्ते यांनी अलिकडेच अध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनिअर, त्यांची पत्नी आणि संसदेच्या सभापतींना ठार मारण्याची धमकी देणारे वक्तव्य उघडपणे केले होते.
अध्यक्षांना धमकी दिल्याबद्दल दुतेर्ते यांना वकील म्हणून अपात्र ठरवण्यात यावे, असी मागणी करणारी याचिका अध्यक्षीय सल्लागार लॅरी गॅडॉन यांनी स्वतंत्रपणे बुधवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. यासंदर्भात दुतेर्ते यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाई व्यतिरिक्त ही फौजदारी तक्रार असणार आहे.
आपली हत्या झाल्यास अध्यक्षांना ठार मारण्यासाठी आपण मारेकऱ्यांना आगोदरच सांगून ठेवले आहे, असे दुतेर्ते म्हणाल्या होत्या. तरीही, माजी अध्यक्षांच्या टिप्पणीची चौकशी पुढे केली जाईल, असे न्याय्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. पोलिस अधिकाऱ्यांवर हल्ला करणे, अवज्ञा करणे आणि गंभीर बळजबरी केल्याच्या फौजदारी अशा गुन्ह्यांना तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षा आहे, असे पोलिस निवेदनात म्हटले आहे.





