खंडणी रॅकेटचा पर्दाफाश; दोघे गजाआड ! उद्योगपतीसह तीन राजकीय नेत्यांकडे खंडणी मागितल्याचे गुन्हे

पुणे – शहरात राजकीय व्यक्तींकडे खंडणी मागणाऱ्या गुन्ह्यांचा उकल करण्यास पोलिसांना यश आले आहे. तरुणीने विवाहास नकार दिल्याने दोघांनी तरुणीला त्रास देण्याच्या हेतूने तिच्या मोबाइल क्रमांकाचा गैरवापर करत राजकीय नेत्यांना खंडणी मागितल्याचे उघड झाले.
या प्रकरणी शाहनवाज गाझीय खान (वय 31, रा. गुरूवार पेठ) याला अटक करण्यात आली. तर यापूर्वीच एकाला अटक करण्यात आली आहे. तरुणीच्या कुटुंबीयांच्या संपत्तीवर डोळा ठेवून त्यांनी विवाहाबाबत विचारणा केली होती. मात्र, तरुणीने दोघांना नकार दिल्याने दोघांनी हे कृत्य केले.
शाहनवाजने माजी नगरसेवक वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश, तसेच एका उद्योजकासह माजी नगरसेवक अविनाश बागवे, आमदार महेश लांडगे यांना प्रत्येकी 30 लाख रुपये खंडणीसाठी व्हॉटसऍप कॉल केले होते. राजकीय नेत्यांकडे खंडणी मागितल्या प्रकरणी चार स्वतंत्र गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल आहेत. आरोपी इम्रान समीर शेख याने समाज माध्यमावर पुणे मॅरेज ब्युरो नावाने ग्रुप सुरू केला होता. या समुहाचा प्रमुख इम्रान समीर शेख होता. आरोपी शाहनवाज ग्रुुपचा सदस्य होता. खराडी भागातील एका तरुणीने संबंधित समुहावर विवाहाबाबत माहिती आणि छायाचित्र प्रसारित केले होते. इम्रानने शाहनवाजचे स्थळ तरुणीला सुचविले होते. तरुणीच्या कुटुंबीयांनी शाहनवाजला नकार दिला. त्यानंतर इम्रानने तरुणीला विवाहासंदर्भात विचारणा केली. इम्रानला नकार देण्यात आला. इम्रानने तरुणीला त्रास देण्यासाठी तिची बदनामी केली. सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणात इम्रानला अटक केली. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.
आरोपी शाहनवाजने तरुणीला त्रास देण्यासाठी राजकीय नेत्यांना खंडणी मागण्याचा कट रचला. व्हॉटसऍपचा वापर करुन त्यांनी नेत्यांकडे प्रत्येकी 30 लाख रुपयांची खंडणी मागितली. शाहनवाजने खंडणीची रक्कम तरुणीच्या मोटारीत ठेवण्यास सांगितले. या प्रकरणात तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली. कोणीतरी तरुणीला त्रास देण्यासाठी हा प्रकार करत असल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. तेव्हा आरोपी इम्रान आणि शाहनवाज खंडणी प्रकरणात सामील असल्याचे उघडकीस आले.
अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, उपनिरीक्षक मोहनदास जाधव, श्रीकांत चव्हाण, विजय गुरव, विनोद साळुंखे, प्रदीप शितोळे, राहुल उत्तरकर, संग्राम शिनगारे, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे आदीनी या प्रकरणाचा तपास केला.
आणखी एक कट उघड
आरोपी शाहनवाज याने चिंचवडमधील शिवसेनेचे खासदार, भोरमधील कॉंग्रेस आमदार, पुण्याचे माजी महापौरांसह आणखी दोन माजी नगरसेवकांकडे खंडणी मागण्याचा कट रचल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याने आणखी राजकीय नेत्यांकडे खंडणी मागण्याच्या तयारीत असल्याची कबुली दिली.





