शिक्रापूर -कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे मटका अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकत दोन हजार रुपये जप्त केले. येथील माजी उपसरपंचासह एकावर मटका चालविल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.
भरत शहाजी गव्हाणे व गणेश ऊर्फ बापू भाऊसाहेब फडतरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. कोरेगाव भीमा स्मशानभूमी परिसरात एक व्यक्ती कागदावर आकडे लिहून लोकांकडून पैसे घेऊन कल्याण नावाचा मटका चालवीत असल्याचे दिसले, यावेळी पोलीस हवालदार सचिन मोरे यांनी तेथील युवकास जागेवर पकडून त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव भरत गव्हाणे सांगितले.
त्याला ताब्यात घेत तेथील मटक्याचे साहित्य व दोन हजार रुपये जप्त करण्यात आले. त्याचेकडे चौकशी केली असता त्याने हा मटका मी आणि गणेश ऊर्फ बापू फडतरे मिळून चालवीत असल्याचे सांगितले.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करीत आहेत. दरम्यान, या आरोपींवर कोरेगाव भीमा दंगलीसह इतर गुन्हे दाखल असून दोघांवरही तडीपारीचे प्रस्ताव दाखल होऊन कारवाई झालेली आहे.