Sandeep Pathak: आम आदमी पार्टीला (आप) रामराम ठोकून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेले राज्यसभा खासदार संदीप पाठक यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. पंजाब पोलिसांनी पाठक यांच्याविरोधात दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांत एफआयआर (FIR) दाखल केले असून, त्यांच्या अटकेसाठी पोलिसांचे एक पथक दिल्लीत पोहोचले आहे. नेमके प्रकरण काय? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप पाठक यांच्यावर पंजाबमधील दोन जिल्ह्यांत अजामीनपात्र कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २ मे रोजी पंजाब पोलिसांचे पथक त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले होते, मात्र पाठक तिथे मिळून आले नाहीत. अद्याप पोलिसांनी या एफआयआरमधील आरोपांचा सविस्तर तपशील अधिकृतपणे सार्वजनिक केलेला नाही. मात्र, प्राथमिक माहितीनुसार यामध्ये भ्रष्टाचार आणि महिलांच्या छळाशी संबंधित कलमे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राजकीय सूडबुद्धीचा आरोप – संदीप पाठक यांनी २४ एप्रिल २०२६ रोजी ‘आप’च्या इतर ६ खासदारांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. या प्रवेशानंतर अवघ्या ८ दिवसांतच ही कारवाई झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजप आणि शिरोमणी अकाली दलाने (SAD) या कारवाईचा तीव्र निषेध केला असून, हा ‘राजकीय सूड’ असल्याचा आरोप केला आहे. जोपर्यंत पाठक ‘आप’मध्ये होते, तोपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही, मग पक्ष बदलताच पोलीस इतके सक्रिय कसे झाले? असा सवाल विरोधी पक्षांनी उपस्थित केला आहे. पाठक यांची प्रतिक्रिया: या प्रकरणावर बोलताना संदीप पाठक म्हणाले की, “मला या एफआयआरबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. अद्याप कोणत्याही सुरक्षा यंत्रणेने माझ्याशी संपर्क साधलेला नाही. मी माझे संपूर्ण आयुष्य प्रामाणिकपणे देशाच्या सेवेसाठी अर्पण केले आहे. देश कोणत्याही पक्षापेक्षा मोठा आहे आणि मी कधीही विश्वासघात करणार नाही. ही कारवाई केवळ विरोधकांच्या घारबटगुंडीचे लक्षण आहे.” ‘आप’ला मोठा धक्का – २४ एप्रिल रोजी आम आदमी पार्टीच्या १० राज्यसभा सदस्यांपैकी ७ सदस्यांनी (संदीप पाठक, राघव चड्ढा, अशोक मित्तल, हरभजन सिंह, राजिंदर गुप्ता, विक्रमजीत साहनी आणि स्वाती मालीवाल) पक्षाच्या धोरणांवर नाराजी व्यक्त करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामुळे राज्यसभेतील ‘आप’चे संख्याबळ आता केवळ ३ वर आले आहे. यापैकी ६ खासदार पंजाबमधील असल्याने पंजाबच्या राजकारणात मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत.