Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरण (Ashok Kharat Case) राज्यभरात चर्चेत असतानाच वसईत स्वयंघोषित धर्मगुरूने केलेल्या महिलेवर अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘मी महादेवाचा अवतार आहे, तू माझी पार्वती आहेस’ असे म्हणत महिलेच्या धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेत तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप या भोंदू बाबावर करण्यात आला आहे. या प्रकरणी (Ashok Kharat Case) वसईच्या माणिकपूर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपासासाठी हे प्रकरण पुण्यातील मांजरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. घटना कशी घडली? पीडित महिला (३५ वर्षे) पुण्यातील रहिवासी आहे. तिच्या फिर्यादीनुसार, २०२३ मध्ये फेसबुकवर तिची ओळख ‘आमची वसई’ या संस्थेचा प्रमुख असलेल्या ऋषिकेश वैद्य या स्वयंघोषित धर्मगुरूशी झाली. वैद्य याने महिलेच्या धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेत तिच्याशी जवळीक साधली. डिसेंबर २०२३ मध्ये तो तिला भेटण्यासाठी पुण्यात आला होता. तेथे त्याने महिलेला भुलवत म्हटले, “मी महादेवाचा अवतार आहे आणि तू माझी पार्वती आहेस.” त्यानंतर तो तिला पुण्यातील मांजरी येथील एका लॉजमध्ये घेऊन गेला. तेथे तिला गुंगीचे पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केला आणि तिचे काही अश्लील फोटो काढले. Ashok Kharat Case ब्लॅकमेल आणि पुन्हा अत्याचाराचा प्रयत्न या अश्लील फोटोंचा वापर करून ऋषिकेश वैद्य याने महिलेला सतत ब्लॅकमेल केले. मे २०२५ मध्ये त्याने तिला वसईतील हॉटेल एक्सप्रेस इनमध्ये भेटायला बोलावले आणि पुन्हा तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. नाशिकमध्ये अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर पीडित महिलेने धैर्य एकवटले आणि आपल्या पतीला संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर बुधवारी संध्याकाळी वसईच्या माणिकपूर पोलिस ठाण्यात ऋषिकेश वैद्य यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. प्रकरण पुण्याकडे वर्ग अत्याचाराची पहिली घटना पुण्यात घडल्याने हे प्रकरण पुण्यातील मांजरी पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे. पोलिस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.ही घटना अशोक खरात (Ashok Kharat Case) प्रकरणानंतर समोर आल्याने राज्यातील भोंदू बाबा आणि स्वयंघोषित धर्मगुरूंच्या कारवायांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. महिलांच्या धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्या अशा नराधमांविरुद्ध कडक कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.