Crime News : ७० लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप
Crime News : महाविद्यालयाविरोधात विद्यापीठ आणि संबंधित शैक्षणिक संस्थांकडे पत्राद्वारे व ई-मेलने तक्रारी करण्याची, माहिती अधिकारातून वैयक्तिक माहिती मागवण्याची तसेच व्हॉट्सप स्टेटसवरून विविध शिखर परिषदांची भीती दाखवून संस्थेची बदनामी करण्याची धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

न्हावरे : विद्यापीठ आणि विविध शैक्षणिक संस्थांकडे तक्रारी करण्याची, माहिती अधिकारातून वैयक्तिक माहिती मागवण्याची तसेच व्हॉट्सप स्टेटसद्वारे संस्थेची बदनामी करण्याची धमकी देत मांडवगण फराटा येथील महाविद्यालयाकडे तब्बल 70 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी संतोष यशवंत आडसूळ (वय 36, रा. बोरी पारधी, ता. दौंड) याला शिरूर पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयीन कोठडीनंतर त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. शरद वसंतराव फराटे (वय 48, रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर) यांनी याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 जुलै 2025 आणि 16 जून 2026 रोजी बोरी पारधी तसेच मांडवगण फराटा येथील श्री. वसंतराव फराटे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर आरोपीने संस्थेवर दबाव निर्माण केल्याचा आरोप आहे.
महाविद्यालयाविरोधात विद्यापीठ आणि संबंधित शैक्षणिक संस्थांकडे पत्राद्वारे व ई-मेलने तक्रारी करण्याची, माहिती अधिकारातून वैयक्तिक माहिती मागवण्याची तसेच व्हॉट्सप स्टेटसवरून विविध शिखर परिषदांची भीती दाखवून संस्थेची बदनामी करण्याची धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या माध्यमातून 70 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप असून, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकशाही व्यवस्थेत तक्रार करणे आणि माहिती अधिकाराचा वापर करणे हा नागरिकांचा कायदेशीर अधिकार आहे. मात्र, या अधिकारांचा आधार घेऊन एखाद्या संस्थेवर तक्रारींची भीती दाखवत आर्थिक मागणी केली जात असेल, तर तो गंभीर प्रकार ठरतो. या प्रकरणातील कथित दबावतंत्रामागील उद्देश आणि घटनाक्रम तपासातून स्पष्ट होणार आहे.
70 लाखांची मागणी कोणत्या कारणावरून करण्यात आली, संस्थेवर दबाव आणण्यासाठी कोणत्या माध्यमांचा वापर झाला आणि या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणातील आरोपांचे नेमके वास्तव पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे.
शिरूर पोलिसांनी 17 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी 5 वाजून 53 मिनिटांनी आडसूळ याला अटक केली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सध्या त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार करीत आहेत.
यापूर्वीही गुन्हा दाखल
संतोष आडसूळ याच्याविरुद्ध यापूर्वीही शिरूर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासात पूर्वीच्या गुन्ह्याची पार्श्वभूमीही महत्त्वाची ठरणार आहे.




