राष्ट्रीय लोक दलाच्या उमेदवाराविरोधात देशद्रोहाचा गुन्हा

बिजनोर – उत्तर प्रदेशाच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पाकिस्तान समर्थनाच्या घोषणा दिल्याबद्दल राष्ट्रीय लोक दलाच्या बिजनोर येथील उमेदवारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय लोकदलाचे बिजनोरचे उमेदवार नीरज चौधरी दारोदारी संपर्क करत असतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.
त्यामध्ये पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या जात असल्याचे ऐकायला मिळत होते. या प्रकरणी चौधरी यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे कोतवाली ठाणे अंमलदार राधे शाम यांनी सांगितले. आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचेही त्यांनी सांगितले. व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लीपमधील ऑडीओ आणि व्हिडीओचीही तपासणी केली जाणार आहे.
या प्रकरणावरुन प्रतिक्रिया देताना राष्ट्रीय लोक दलाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांनी मतदारांना सावध रहाण्याचे आवाहन केले आहे. ही निवडणूक म्हणजे नव्या भारतातील बंधुत्व विरुद्ध भाजपा अशी लढाई आहे. अकिभ भाई जिंदाबाद अशी घोषणा पाकिस्तान झिंदाबाद अशी ऐकू आली असेल. बिजनौरचे लोकदालाचे उमेदवार नीरज चौधरी हे डॉक्टर आहेत. त्यांना छेडछाड केलेल्या व्हिडीओद्वारे देशद्रोही ठरवण्यासाठी काही मूर्ख लोक प्रयत्न करत आहेत, असे जयंत चौधरी यांनी म्हटले आहे.





