प्रभात वृत्तसेवा सोनई – माजी सरपंचाने सोनई येथील हाॅटेल व्यावसायिकास तू आमच्या विरोधात बोलतो काय? तुझ्याकडे व तुझ्या भावाकडे बघावे लागेल. थांब थोडे दिवस तुमच्या दोघांचा काटा काढावा लागेल, अशी जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे सोनई येथील हॉटेल व्यवसायिक अनिल पोपटराव शेटे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सरंक्षण देण्याची मागणी निवेदनातून केली आहे. मी गेल्या दहा वर्षापासून सोनईमध्ये हॉटेलचा व्यवसाय करत असून सोनई गावातील वाढती गुन्हेगारी, त्यामुळे ग्रामस्थांना व व्यापाऱ्यांना तसेच ग्रामस्थांना सुद्धा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मध्यंतरी सोनई गावातील वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांनी सोनई पोलीस ठाण्यासमोर २९ ऑक्टोबर रोजी मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चात लक्ष्मण (लखन) जगदाळे, अनिल शेटे यांच्यासह अनेक ग्रामस्थ व व्यावसायिक यांनी आपली मनोगत व्यक्त केली होती. मात्र, याचा राग मनात धरून माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्याने १ डिसेंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास सोनई बसस्थानकाजवळ भेटून जीवे मारण्याची धमकी दिली होती. ‘तू आमच्या विरोधात बोलतो काय, तुझ्याकडे व तुझ्या भावाकडे बघावे लागेल. थांब थोडे दिवस तुमच्या दोघांचा काटा काढावा लागेल, अशी जीवे मारण्याची धमकी दिली होती. सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले पण ३ डिसेंबरला लक्ष्मण जगदाळे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला.या हल्लाप्रकरणात ही टोळी सहभागी असल्याने समजले. ही टोळी माझ्यावर पण हल्ला करू शकते. कारण त्यांनी माझ्या घराजवळ व हॉटेल जवळ रेकी सुरू केली आहे. यामुळे मला हॉटेल व्यवसायनिमित्त रात्री उशिरापर्यंत हॉटेलवर थांबावे लागते. या गुन्हेगार टोळीला अटक करून गावातील गुन्हेगारी थांबून आमचे संरक्षण करावे, अशा आशयाचे निवेदन हॉटेल व्यावसायिक अनिल शेटे यांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना दिले.