कोलकाता : पश्चिम बंगालमधील कृष्णनगरमध्ये नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या इशिता मलिक या महाविद्यालयीन विद्यार्थिनीची तिच्याच घरात घुसुन गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोलिसांनी २३ वर्षीय देबराज सिंगचे नावाच्या युवकाला ताब्यात घेतले आहे. तो इशिताचा मित्र असल्याचे सांगितले जात आहे. प्राथमिक तपासानुसार, या दोघांचे २०२३ मध्ये सुरू झालेले नाते अलिकडच्या काही महिन्यांत तुटले होते, त्यानंतर इशिताने आरोपीशी बोलणे बंद केले होते. २०२३ मध्ये इशिताने व्हिक्टोरिया कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता, ती लवकरच मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेणार होती. आरोपीने इशिताला जवळून गोळ्या घातल्याआहेत. ही घटना दुपारी २:३० च्या सुमारास घडली. त्यावेळी इशिता घरी एकटी होती. याचा फायदा घेत आरोपी घरात घुसला आणि तिच्यावर गोळी झाडून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच कृष्णनगर कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, तृणमूल कॉंग्रेसचे सरचिटणीस कुणाल घोष म्हणाले, ही एक दुःखद घटना आहे आणि त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. तरीही, सत्य बाहेर आले पाहिजे आणि पोलिसांनी अशा सामाजिक गुन्ह्यांवर कठोर कारवाई करावी. या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जातो आहे.