Crime News : खळबळजनक! शिक्षकाडून होत असलेल्या छळाला कंटाळून विद्यार्थीनीने स्वत:ला पेटवलं

बालासोर : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील फकीर मोहन कॉलेजच्या एका विद्यार्थिनीने कॉलेज कॅम्पसमध्येच स्वतःला पेटवून घेतले. कॉलेजच्या एका शिक्षकाकडून बऱ्याच काळापासून तिचा छळ केला जात असल्यामुळे तिने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. ही संपूर्ण घटना कॉलेजबाहेर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे, ज्यामध्ये मुलगी भाजल्यानंतर वेदनेने धावताना दिसत आहे. या प्रकरणात कॉलेजचे प्राचार्य दिलीप कुमार घोष यांना निलंबित करण्यात आले आहे.
ही घटना शनिवारी दुपारी एफएम कॉलेज कॅम्पसमध्ये घडली. ही विद्यार्थिनी इंटिग्रेटेड बी.एड. प्रोग्रामच्या दुसऱ्या वर्षात शिकते. विद्यार्थिनीने कॉलेजच्या इंटिग्रेटेड बी.एड. विभागाचे एचओडी समीर कुमार साहू यांच्यावर शारीरिक आणि मानसिक छळाचा आरोप केला आहे. या छळाबद्दल विद्यार्थिनीने अनेक वेळा तक्रार केली होती, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
एवढेच नाही तर, ती विद्यार्थिनी काही दिवसांपासून कॉलेजच्या गेटवर धरणे धरत होती. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, घटनेदरम्यान ती विद्यार्थिनी कॉलेजच्या बाहेर एकटीच आली होती. तिच्यासोबत रॉकेलचा कॅन होता. काही वेळातच तिने स्वतःवर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. आगीच्या ज्वाळा वाढताच ती वेदनेने ओरडत पळू लागली.
एक विद्यार्थी तिला वाचवण्यासाठी धावला आणि आग विझवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. पण त्यात तोही गंभीर जखमी झाला. स्थानिक लोकांनी दोघांनाही तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले. तिथून दोघांचीही प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना एम्स भुवनेश्वर येथे पाठवण्यात आले.





