Crime News : धक्कादायक ! कार चालकाच्या मारहाणीनंतर रिक्षाचालकाची आत्महत्या

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीच्या मोठा गाव परिसरात एका भीषण घटनेने खळबळ उडाली आहे. कार चालकाने मारहाण करून 2 लाख रुपयांची नुकसान भरपाई मागितल्याने तणावाखाली आलेल्या 70 वर्षीय रिक्षाचालक मुंजाजी शेळके यांनी आज आत्महत्या केली.
मंगळवारी रात्री ऑटो आणि कारची धडक झाली होती. त्यानंतर कार चालक, जो ठाकरे गटाचा पदाधिकारी असल्याची प्राथमिक माहिती आहे, त्याने मुंजाजी शेळके यांना मारहाण केली आणि डांबून ठेवत 2 लाख रुपयांची मागणी केली. मध्यरात्री 3 वाजता त्यांची सुटका झाल्यानंतर शेळके यांनी टोकाचे पाऊल उचलले.
या घटनेने संतप्त झालेल्या शेळके यांच्या नातेवाईकांनी विष्णू नगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत आरोपी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.





