Crime News : शेळ्या आणि बोकडे चोरणाऱ्या टोळीला नेवासा पोलिसांनी केले जेरबंद

नेवासा : मागील काही दिवसांपासून नेवासा तालुक्यात शेळ्या व बोकडे चोरणाऱ्या चोरांना नेवासा पोलिसांनी अद्दल घडवत जेरबंद केले आहे. तालुक्यात शेळ्या व बोकडे चोरणाऱ्या चोरांचा सुळसुळाट झालेला होता. याबाबत नागरिकांनी नेवासा पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केलेल्या आहेत. दि. ५ डिसेंबर रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास निपाणी निमगांव येथील आवेश एकनाथ चव्हाण यांच्या राहत्या घरासमोरील २५ हजार रुपये किंमतीच्या दोन शेळ्या व एक बोकड चोरून नेलेला होता.
याबाबत आवेश चव्हाण यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केलेली होती. पोलिसांनी तातडीने निपाणी निमगांव परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता एक संशयास्पद मारुती स्विफ्ट कार मध्यरात्री फिरत असल्याचे दिसून आली. नेवासा पोलिसांनी सदर स्विफ्ट कारचा माग काढला असता तो पाचेगांवपर्यंत गेला.
पाचेगांव परिसरातील या कार बाबत पोलिसांनी गोपनीय माहिती काढली असता विजय मच्छिंद्र माळी, दिलीप द्वारकानाथ माळी,संतोष सुभाष माळी,सोमनाथ रावसाहेब माळी व बापू विनायक माळी यांची टोळी असून सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसणारी या प्रकारची कार या लोकांकडे आहे अशी खत्रीशीर माहिती पोलिसांना मिळालेली होती. त्यानंतर नेवासा पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली असता सोमवारी रात्री नेवासा पोलिसांनी छापा टाकून आरोपींना मारुती स्विप्ट कारसह शिताफिने पकडले त्यानंतर या आरोपींकडे बारकाईने विचारपूस केले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
यापूर्वी नेवासा तालुक्यात अनेक शेळ्या व बोकडे चोऱ्या झालेल्या आहेत. याबाबत पोलीस अधिक सखोल तपास करणार आहेत. आरोपींना मंगळवारी नेवासा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींची गुरुवार (दि.१९) डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली नेवासा पोलिसांकडून करण्यात आली आहे.





