Crime News : रॅगींगला वैतागून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थाने उचलले ‘हे’ पाऊल

जबलपूर : मध्य प्रदेशातील जबलपूर येथे वैद्यकीयचा विद्यार्थी शिवांश गुप्ता याने आत्महत्या केली होती. या प्रकरणाला आता आणखी एक नवीन वळण प्राप्त झाले आहे. त्याने तीन दिवसांपूर्वी त्याच्या आईला फोन करून घटनेची माहिती दिली होती असे समोर येते आहे. कुटुंबाने शिवांश गुप्ता याच्यावर रॅगिंग झाल्याचा आरोप केला आहे.
शिवांशचे काका दिनेश गुप्ता यांनी आरोप केला आहे की शिवांशने तीन दिवसांपूर्वी त्याच्या आईला फोन करून रॅगिंगबद्दल सांगितले होते. गुरुवारी एमबीबीएस प्रथम वर्षाचा विद्यार्थी शिवांश गुप्ता याने वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. आज शिवांशचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांना सोपवताच घटनास्थळी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी जमली. शिवांशच्या कुटुंबियांनी जबलपूर पोलिस आणि मेडिकल कॉलेज व्यवस्थापनाकडे संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची आणि दोषी सिनिअर विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. नवनीत सक्सेना यांनी रॅगिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय पथक तयार केले आहे. शिवांशचे काका दिनेश गुप्ता यांनी रॅगिंगबाबत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, आत्महत्या करण्याच्या तीन दिवस आधी शिवांशने त्यांच्या आईला फोन करून सांगितले होते की, त्याचे वरिष्ठ त्याला नवीन बाईक खरेदी करण्यासाठी रॅगिंग करत आहेत. त्यांनी आरोप केला की, शिवांशचे रूममेट भीतीपोटी गप्प आहेत.
असे सांगितले जात आहे की, शिवांश हा खूप हुशार मुलगा होता आणि त्याने पहिल्याच प्रयत्नात नीट उत्तीर्ण केली होती. त्याच्या दोन बहिणी देखील डॉक्टर आहेत. अशा परिस्थितीत, रॅगिंगमुळे आत्महत्या केल्याने वैद्यकीय महाविद्यालय व्यवस्थापनाच्या शिस्तीवर आणि रॅगिंग नसल्याच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते.





