पिंपरी – तरुणाच्या गाडीला पाठीमागून धक्का देत खाली पाडून जखमी केले व उपचारासाठी नेतो म्हणत खिशातील एटीएम कार्ड हिसकावून घेत जबरदस्ती त्याचा पिन घेऊन लुटल्याचा प्रकार रुपीनगर येथे सोमवारी (दि.1) घडला आहे.
प्रदीप शिवाजी माने (वय-27 रा. आकुर्डी) यांनी फिर्याद दिली असून तीन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माने हे कामावरुन घरी परतत असताना त्यांच्या गाडीला मागून येणाऱ्या दुचाकीने धक्का दिला. यामुळे माने खाली पडले, दुचाकीवरील तिघेही खाली उतरले व त्यांनी तुम्हाला लागले आहे आम्ही दवाखान्यात नेतो म्हणून बहाणा केला व फिर्यादी यांच्या अंगाची झडती घेत त्यांच्या जवळील एटीएम कार्ड काढून घेतले व धमकावून त्या कार्डचा पिन नंबर घेतला. चोरट्यांनी फिर्यादी यांच्या खात्यावरून 6 हजार 500 रुपये काढून घेतले. चिखली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे.