पुसेसावळी -विनापरवाना वृक्षतोड व लाकडाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर अडवल्याच्या कारणावरून सुरेश शिवाजी भाग्यवंत याने पुसेसावळीचे वनपाल विष्णुपंत बिचुकले यांना कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करून पायाला चावा घेतल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी बिचुकले यांनी औंध पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वनपरिक्षेत्र अधिकारी सौ. एस. एन. फुंदे व चालक महेश पाटोळे हे गोरेगाव वांगी परिसरात मंगळवारी गस्त घालत असताना तेथून विनानंबरचा ट्रॅक्टर रायगाव फाट्याकडे लाकडाची वाहतूक करताना दिसला. हा ट्रॅक्टर थांबवून त्यांनी चालक सुरेश भाग्यवंतकडे परवान्याची विचारणा केली. त्यावर, परवाने नसल्याचे त्याने सांगितले.
सौ. फुंदे यांनी भाग्यवंत याला शासकीय वाहनातून कार्यालयात येण्यास सांगितले. त्यास नकार देऊन भाग्यवंत हा ट्रॅक्टर घेऊन गोरेगाव वांगीकडे निघाला. हा ट्रॅक्टर वनपाल विष्णुपंत बिचुकले गावाच्या प्रवेशद्वारापासून 300 मीटर अंतरावर अडवला. त्यावेळी भाग्यवंत याने बिचुकले यांना शिवीगाळ, दमदाटी करत कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली. त्यानंतर बिचुकले यांच्या पायाचा चावा घेऊन बाजूला चिखलात ढकलून दिले. याप्रकरणी सपोनि उत्तम भापकर तपास करत आहेत.