प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिस्तुल खरेदी करुन खुनाचा कट रचणाऱ्या आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या आठपैकी सहा मुले अल्पवयीन आहेत. वाघोली येथे एका तरुणाचा खून करण्याच्या तयारीत ही टोळी होती. परंतु आधीच माहितीहाती लागल्याने पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने यांना ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी (दि.४) सायंकाळी सांगवी येथे औंध हॉस्पिटल मागील मैदानात करण्यात आली. याप्रकरणी सहा अल्पवयीन मुलांसह आर्यन फंड (वय १९, रा.रांजणगाव, पुणे), गुरु सिंग (वय २३, रा.मध्य प्रदेश) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप गोडांबे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुनाच्या तयारीत असणारी सहा अल्पवयीन मुले हत्यारासह औंध हॉस्पिटल मागील मैदानात असल्याची माहिती पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांनी वाघोली येथील रवी ससाने याचा खून करण्यासाठी आरोपी आर्यन आणि गुरु सिंग यांच्याकडून एक लाख रुपये किमतीची दोन पिस्तुले आणि दोन काडतूसे खरेदी केल्याचे सांगितले. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.