फलटण (प्रतिनिधी) – पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून खामगाव, ता. फलटण येथील जितेंद्र विलास काळे यांचे घर जाळल्याप्रकरणी सहा जणांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आगीत 50 हजार रुपये रोकड, सोन्याचे दागिने आणि घरातील सर्व सामान जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जितेंद्र काळे हे पत्नीसह काल (दि. 4) सकाळी 10 च्या सुमारास बाहेरगावी गेले असता, घर जळाल्याची माहिती त्यांना समजली. ते खामगाव येथे पोहोचले असता, त्यांच्या घराचा दरवाजा उघडा होता आणि कुलूप तुटलेले होते.त्यांनी आत जाऊन पाहिले असता, कपाटातील कपडे, रग व घरातील इतर वस्तू जळलेल्या दिसल्या. कपाटात ठेवलेली 19 ग्रॅमची सोनसाखळी आणि 50 हजार रुपयांची रोकड दिसली नाही. या जाळपोळ व चोरीप्रकरणी त्यांनी जॉनी नंदू भोसले, सागर नंदू भोसले, हिरा शर्करा पवार, किरण पिसुरड्या शिंदे, शायर पाग्या भोसले, वर्धमान आरोग्य शिंदे (रा. साखरवाडी, ता. फलटण) यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे. यापूर्वी काळे यांनी संशयितांविरोधात तक्रार दाखल केली होती. ती तक्रार मागे घे, नाही तर तुझे घरदार जाळून टाकीन, अशी धमकी संशयितांनी दिली होती, असे काळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सपोनि हजारे तपास करत आहेत.