#Crime : प्रवाशांना लुटणाऱ्या रिक्षाचालकासह साथीदार गजाआड

पुणे : प्रवाशांना धमकावून लूटमार करणाऱ्या रिक्षाचालकासह साथीदारांना सहकारनगर पोलिसांनी पकडले. चोरट्यांकडून एक लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चोरट्यांच्या टोळीकडून प्रवाशांना लुटण्याचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
याप्रकरणी वसिम अजमल खान (31 ), अन्सार आयुब खान (32 , दोघे रा. शिवनेरीनगर, कोंढवा), मोसीन खान नुर खान पठाण (22 , रा. सुरेशदादा जैननगर, हुडको, पिपाळा, जि. जळगाव), अब्दुल करिम बार्शीकर (26 , रा. लोणी काळभोर) यांना अटक करण्यात आली.
सेल्वम शंकरलिंगम पिल्ले (48 , रा. स्प्रींग हाईट्स सोसायटी,दत्तनगर, कात्रज) यांनी यासंदर्भात सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार पिल्ले मार्केटयार्ड भागातून सातारा रस्त्याकडे निघाले होते. रिक्षाचालक आणि त्याचे साथीदार रिक्षात प्रवासी म्हणून बसले होते.
प्रवासादरम्यान पिल्ले यांना धक्काबुक्की करून रिक्षाचालक खान आणि साथीदारांनी पिल्ले यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेली. पिल्ले यांनी सहकारनगर पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर तातडीने तपास सुरू करण्यात आला. सातारा रस्त्यावरील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले.
चित्रीकरणात आढळलेल्या संशयित रिक्षाच्या वाहन क्रमांकावरून तपास सुरू करण्यात आला. त्यानंतर पसार झालेल्या चौघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींकडून प्रवाशांना लुटण्याचे आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता सहकारनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांनी व्यक्त केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई, गुन्हे शाखेतील निरीक्षक युनूस मुलाणी, उपनिरीक्षक सुधीर घाडगे, बापू खुटवड, प्रकाश मरगजे, संदीप ननवरे, सतीश चव्हाण यांनी ही कारवाई केली.





