मुंबई – सुप्रिया सोबिती गुप्ता दिग्दर्शित डॉक्युमेंटरी फिल्म कॉट आऊट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच या डॉक्युमेंट्री चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. हा चित्रपट भारतातील क्रिकेटची क्रेझ आणि मॅच फिक्सिंगवर आधारित आहे. या डॉक्युमेंट्रीद्वारे मॅच फिक्सिंगबाबतची मोठी स्टोरी सर्वसामान्यांना पाहायला मिळणार आहे.
ही डॉक्युमेंट्री अनेक पैलू आणि समस्यांशी निगडीत आहे. या माहितीपटात क्रिकेट जगताने भ्रष्टाचाराच्या सर्वात मोठ्या घोटाळ्यांशी कसा सामना केला आहे हे दाखवले आहे. 90 च्या दशकात प्रत्येकाला क्रिकेट खेळायचे होते हे दाखवून ट्रेलरची सुरुवात होते, त्यानंतर भारताच्या क्रीडा मंत्र्यांनी मॅच फिक्सिंगची सीबीआय चौकशी करण्याची घोषणा केल्याचे ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.
हा ट्रेलर खूपच दमदार आहे. मॅच फिक्सिंगचे तार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जोडलेले असल्याचेही ट्रेलरमध्ये दिसून येते. त्याचवेळी, ट्रेलरमध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने देखील फिक्स होत असल्याचे दाखवण्यात आले आहे. या घोषणेनंतर क्रिकेट जगतातील तमाम लोकांना धक्का बसतो असं या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत. क्रिकेट जगातला हादरवून टाकणाऱ्या फिक्सिंग प्रकरण या डॉक्युमेंट्रीमुळे सर्वांसमोर येणार आहे.
या डॉक्युमेंट्रीद्वारे क्रिकेट जगतातील पडद्यामागचे अनेक खुलासे सर्वसामान्यांसमोर येणार आहेत. ज्यामध्ये अनेक बड्या चेहऱ्याचा देखील समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही डॉक्युमेंट्री 17 मार्च रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.