कोलकाता नाईट रायडर्सने केली मोठी घोषणा; ‘या’ दिग्गज खेळाडूकडे सोपवलं मेंटोरपद

शाहरुख खानची मालकी असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सकडून नुकतीच एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामीची महिला कॅरेबियाई प्रीमिअर लीगआधी ट्रिनबागो नाईट रायडर्सच्या मेंटोरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महिला कॅरेबियाई प्रीमिअर लीगचा हा चौथा हंगाम आहे. यंदा ही स्पर्धा 21 ऑगस्ट ते 29 ऑगस्टदरम्यान खेळवली जाणार आहे. ट्रिनबागो नाईट रायडर्सने 2021 मध्ये पहिल्या हंगामात या लीगचे जेतेपद पटकावले होते.
झूलन गोस्वामीने मानले आभार
महिला कॅरेबियाई प्रीमिअर लीगच्या तिसऱ्या हंगामापूर्वी केकेआर व्यवस्थापनाने झुलन गोस्वामीची मेंटोर म्हणून नियुक्ती केली आहे. टीकेआरबरोबर काम करायला मिळणं ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं झुलनने म्हटलं आहे.यासाठी तिने केकेआर व्यवस्थापनाचे आभार देखील मानले आहेत.
झूलन गोस्वामीची कारकीर्द
झुलन गोस्वामी ही भारतीय महिला क्रिकेट संघाची दिग्गज खेळाडू आहे. तब्बल दोन दशकं झुलनने भारतीय महिला संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 2002 मध्ये झुलनने भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. यानंतर 2022 पर्यंत ती भारतासाठी खेळत होती. आपल्या या मोठ्या क्रिकेट कारकिर्दीत झुलने टीम इंडियाला अनेक सामने एक हाती जिंकून दिले आहेत. झुलनच्या नावावर कसोटी सामन्यात 44 विकेटची नोंद आहे. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीने 255 विकेट घेतल्यात. टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात तीने 56 विकेट घेतल्यात.
कधी सुरु होणार ही लीग ?
कॅरेबियाई प्रीमिअर लीग 2024 ची सुरुवात पुढच्या महिन्यात म्हणजे 21 ऑगस्टपासून होणार आहे. या स्पर्धेत तीन संघ असून यात ट्रिनबागो नाईट रायडर्स, बारबाडोस रॉयल्स आणि गयाना अमेजन वॉरियर्स या संघांचा समावेश आहे. तीन संघांमध्ये एकूण सात सामने खेळवले जातील. हे सर्व सामने ब्रायन लारा क्रिकेट अकॅडमीत खेळवण्यात येणार आहे.





