सिडनी :- क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बुधवारी राष्ट्रीय पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांचा कार्यकाळ २०२७ पर्यंत वाढविला असून ते दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत पदावर राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जस्टिन लँगर यांनी २०२२ मध्ये प्रशिक्षकपदाचा कार्यभार सोडल्यानंतर अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांची क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नियुक्ती मुख्य प्रशिक्षकपदी केली होती. त्याच्या कार्यकाळात ऑस्ट्रेलिया संघाने विश्व कसोटी स्पर्धेचे व एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. याचबरोबरीने ऑस्ट्रेलिया संघाने इंग्लंडला पराभूत करताना महत्वाच्या ऍशेस कसोटी मालिकेचे देखील विजेतेपद मिळविले होती. त्याच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात ऑस्ट्रेलिया संघाने अभूतपूर्व यश संपादन केले आहे. त्यांनी एका मजबूत प्रशिक्षण प्रणाली विकासित करताना, खेळाडूंना सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी उत्कृष्ट वातावरण तयार केले, यामुळे आम्ही त्यांच्या कामगिरीवर खुश असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ निक हॉकले यांनी सांगितले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांना जवळपास १३ महिन्यांची मुदतवाढ दिली असून ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया संघ भारत व इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळणार असून याचबरोबरीने एमसीजीवर होणाऱ्या १५० व्या वर्धापनदिन कसोटीचा देखील समावेश असणार आहे.