कराड, (प्रतिनिधी) – मराठा क्रांती मोर्चा, कराड तालुक्यातर्फे 10 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे-पाटील यांची सातारा येथे होणाऱ्या शांतता रॅलीचे नियोजन करण्यासाठी येथील विश्रामगृहात सोमवारी बैठक झाली. या बैठकीमध्ये मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या आत ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी काढण्यात येणाऱ्या शांतता रॅलीबाबत गावोगावी जाऊन जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सदर शांतता रॅलीला तालुक्यातून लाखोंच्या संख्येने उपस्थिती दर्शवण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. या बैठकीस मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीमध्ये अनेक निर्णय घेण्यात आले. गावोगावी जाऊन मराठा समाजाला 50 टक्केंच्या आत ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण मिळावे, यासाठी मराठा समाजबांधवांमध्ये जनजागृती करून मनोज जरांगे-पाटील यांची भूमिका समजावून सांगणे, तालुक्यातील प्रत्येक मराठा बांधवांनी आपापल्या गावामध्ये जागृती करून जास्तीत जास्त मराठा बांधव- भगिनींनी दहा तारखेला सातारा येथे होणाऱ्या शांतता रॅलीसाठी लाखोंच्या संख्येने उपस्थिती दर्शवणे, जरांगे-पाटील यांचे आगमन झाल्यानंतर वारंजी फाटा येथे मराठा क्रांती मोर्चा, कराड तालुका आणि पाटण तालुक्यांतर्फे स्वागत करणे, उंब्रज येथेही जरांगे-पाटील यांचे स्वागत करणे, आठ ऑगस्ट रोजी कराड दक्षिण व कराड उत्तर मतदारसंघातील विद्यमान आमदार, लोकप्रतिनिधी, तसेच 2019 साली विधानसभेला दोन व तीन नंबरची मते घेतलेल्या प्रत्येक पक्षांच्या नेत्यांना मराठा क्रांती मोर्चा, कराड तालुक्यातर्फे भेटून मराठा समाजाला 50 टक्यांच्या आतील ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण मिळावे आणि सगेसोयरेचा अध्यादेश तात्काळ काढण्याबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट विचारणे आदी निर्णय घेण्यात आले. बैठकीत खा. अनिल बोंडे यांनी जरांगे-पाटील यांना अपशब्द वापरून मराठा समाजाचा अपमान केल्याबद्दल निषेध नोंदवण्यात आला. तसेच येणाऱ्या पुढील काळामध्ये अनिल बोंडे जेव्हा कधी कराड तालुक्यामध्ये आल्यास त्यांना चपलाचा हार घालण्याचा एकमुखी निर्णयही यावेळी घेण्यात आला.