राजगुरूनगर -प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा ग्रामीण भागातील उमेदवारांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा व त्यातून रोजगार निर्मिती करावी, असे आवाहन खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे यांनी केले. हॉलिस्टिक स्किल राजगुरुनगर या मान्यताप्राप्त संस्थेच्या वतीने व प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने अंतर्गत सुशिक्षित बेरोजगारांना मोफत प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते.
यावेळी राजगुरूनगर सहकारी बॅंकेचे अध्यक्ष गणेश थिगळे, गव्हाणे करीअर ऍकॅडमीचे संस्थापक वामन गव्हाणे यांच्यासह मोठ्या संख्येने युवती, महिला उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ब्युटी पार्लर व लॉजिस्टिक मॅनेजमेंट या दोन कोर्ससाठी लागणाऱ्या साहित्याच्या मोफत वाटप प्रशिक्षण घेणाऱ्या 80 विद्यार्थ्यांना करण्यात आले.
अंकुश राक्षे म्हणाले, महिला चूल मुल ही संकल्पनेतुन बाहेर यावे यासाठी शासन विविध योजना राबवित असते. लॉजिस्टिक प्रशिक्षणामुळे चाकण इंडस्ट्रीमध्ये युवतींना चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते. पंचायत समिती व जिल्हा परिषद या अंतर्गत महिला, युवतींसाठी स्वयंरोजगाराच्या निर्मितीसाठी राबविण्यात येत आहेत.
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत जास्तीत जास्त ग्रामीण भागातील उमेदवारांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा व त्यातून रोजगार निर्मिती करावी. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वामन गव्हाणे यांनी, सूत्रसंचालन ऍड. शुभम गाडगे यांनी तर स्वप्नील मिरजे यांनी आभार मानले.
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने अंतर्गत सुशिक्षित बेरोजगारांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वयंरोजगाराकडे वळावे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना राष्ट्रीयकृत बॅंकांकडून अर्थसहाय्य केले जाते. राजगुरूनगर सहकारी बॅंकेच्या माध्यमातून लघु उद्योगांना अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल.
– गणेश थिगळे, अध्यक्ष, राजगुरूनगर सहकारी बॅंक