शिरूर : यशवंतराव चव्हाण कला व क्रीडा महोत्सव अंतर्गत बीटस्तरीय स्पर्धा दिनांक 3 व 4 डिसेंबर रोजी महागणपती ग्लोबल स्कूल रांजणगाव गणपती या ठिकाणी संपन्न झाल्या. स्पर्धेची सुरुवात शिरूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांनी क्रीडाज्योत प्रज्वलन करून केली. स्पर्धेचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य स्वाती पाचुंदकर यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर त्याचप्रमाणे विद्या विकास एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास शेळके उपस्थित होते. देशाचे उज्वल भविष्य शाळेमध्ये घडत असते. या लहान वयात मुलांना जर खेळाची आवड निर्माण झाली तर भावी पिढी निरोगी, सुदृढ आणि निर्व्यसनी होईल . यासाठी विद्यार्थ्यांमधील उपजत क्षमता ओळखून त्यांना शिक्षक व पालकांनी संधी निर्माण करून देऊन प्रेरणा द्यावी असे उद्गार सरदवाडी बीटचे विस्ताराधिकारी किसन खोडदे यांनी काढले. तर खेळाच्या माध्यमातून खिलाडीवृत्ती वाढवा आणि आनंददायी शिक्षण घेऊन एक दिवस ऑलिंपिक सुवर्णपदकाला गवसणी घाला, अशा शुभेच्छा जिल्हा परिषद सदस्य स्वाती पाचुंदकर यांनी दिल्या. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य आणि स्वतः एक खेळाडू असलेल्या विक्रम पाचुंदकर यांनी मैदानावर उपस्थित राहून विविध खेळाचा आनंद घेतला आणि खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष माऊली पुंडे, शिक्षक नेते संतोष शेवाळे, संचालक संतोष थोपटे, विवेकानंद फंड यांनी मनोगत व्यक्त केले. दोन दिवसीय क्रीडा प्रकारांमध्ये पहिल्या दिवशी मैदानी स्पर्धा पार पडल्या आणि दुसऱ्या दिवशी कला प्रकारातील सर्व स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाल्या. दुसऱ्या दिवशी शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी कला प्रकारातील खेळाचे उद्घाटन करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महागणपती ग्लोबल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास शेळके सर यांनी शाळेतर्फे स्पर्धेसाठी आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. तसेच विद्यार्थ्यांना परिश्रमातून मिळालेल्या यशाचा आनंद कसा असतो हे आपल्या मनोगतातून सांगितले. भाऊसाहेब दहिफळे यांनी जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि सर्व खेळाडू व पंचांचे स्वागत केले. खेळाडूंना खेळाची प्रतिज्ञा दिली. विठ्ठल देशमुख यांनी मल्लखांबाचे प्रात्यक्षिक दाखवले. दोन दिवसीय स्पर्धेसाठी रांजणगाव गणपतीचे केंद्रप्रमुख कैलास लोखंडे, कोंढापुरी चे केंद्रप्रमुख विजय गोडसे, सरदवाडीचे केंद्रप्रमुख दत्तात्रय गडदरे, आणि कारेगाव चे केंद्रप्रमुख संजय सुतार, संपत वाळके, महागणपती स्कूल चे प्राचार्य अरविंद गोळे यांनी कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले. पंच म्हणून सुभाष पाचकर, मच्छिंद्र खैरनार, हर्षदा फंड, चंद्रकांत भोजने ,ज्ञानेश्वर गोरे, जालिंदर मोहिते, महेश इंगळे, मिलिंद आबनावे सविता रासकर व इतर माध्यमिक कला व क्रीडा शिक्षकांनी काम पाहिले. सर्व खेळाडू व पंचांना दुपारच्या भोजनाची व्यवस्था महागणपती देवस्थान ट्रस्ट यांच्यावतीने करण्यात आली. सूत्रसंचालन दीपक सरोदे यांनी तर आभार संजय कुमार वाळके सर यांनी मानले.