Heath Streak Death : क्रिकेटविश्वात शोककळा, झिम्बाब्वेचा माजी कर्णधार हीथ स्ट्रीकचे वयाच्या 49 व्या वर्षी निधन!

Heath Streak Death : झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी अष्टपैलू खेळाडू हीथ स्ट्रीक यांचे निधन झाले आहे. वयाच्या 49 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. (Legendary former Zimbabwe cricketer Heath Streak passes away) दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज देत असलेल्या हिथ स्ट्रीक यांनी 3 सप्टेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. हीथ स्ट्रीकच्या मृत्यूची माहिती त्याची पत्नी नदिन स्ट्रीक हिने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
यापूर्वी 23 ऑगस्ट रोजी त्याच्या निधनाबद्दल अफवा पसरली होती. मात्र, आता त्याच्या निधनाची पुष्टी त्याच्या कुटुंबाकडूनच करण्यात आली आहे. स्ट्रीकची पत्नी नादिनने त्याच्या निधनाची पोस्ट केली आहे.
12 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत स्ट्रीकने जवळपास 4 वर्षे झिम्बाब्वे संघाचे कर्णधारपदही सांभाळले आहे. 2000 ते 2004 पर्यंत, स्ट्रीकने कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही प्रकारात झिम्बाब्वे संघाचे नेतृत्व केले. त्याचबरोबर झिम्बाब्वेसाठी कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम आजही हीथ स्ट्रीकच्या नावावर आहे. स्ट्रीकने 1993 मध्ये पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती.
आपल्या 12 वर्षांच्या कारकिर्दीत हीथनं तब्बल 65 कसोटी आणि 189 एकदिवसीय सामन्यांत झिम्बाब्वेचं प्रतिनिधित्व केलं आहे. कसोटी सामन्यांत 100 बळी घेणारा आणि संघाच्या गोलंदाजीची धुरा सांभाळणारा तो झिम्बाब्वेचा एकमेव गोलंदाज आहे.
आजच्या घडीलाही हीथ स्ट्रीक कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये झिम्बाब्वेसाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याच्या नावावर कसोटीमध्ये 216 आणि एकदिवसीय सामन्यात 239 विकेट्स आहेत. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये 100 बळी घेणारा स्ट्रीक हा झिम्बाब्वेचा पहिला क्रिकेटपटू ठरला.
100 कसोटी बळी आणि 1000 कसोटी धावांची दुहेरी कामगिरी करणारा तो झिम्बाब्वेचा एकमेव क्रिकेटपटू आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये 2000 धावा आणि 200 बळी घेणाराही तो झिम्बाब्वेचा एकमेव खेळाडू आहे.



