अमली पदार्थ तस्करांचा बंदोबस्त करा; शिवसेना शहर प्रमुखांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

पुणे – शहरात अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री वाढली आहे. या टोळ्यांचा कडक बंदोबस्त व कारवाई करण्याचे आदेश देऊन तपास यंत्रणा सक्षम करावी, अशी मागणी शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
या अमली पदार्थाच्या तस्करीमध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय टोळ्या सक्रिय असल्याचे निदर्शनास आलेले आहे. पुण्यात वाढत चाललेल्या तस्करीला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणेने कठोर कारवाई करावी, अमली पदार्थाची तस्करी सोशल नेटवर्किंग साइटवर आणि व्हॉट्स ऍपवर सक्रिय असलेला तरुण वर्ग यांच्यापर्यंत व्यसनाची साधने गुप्तपणे पोहचवल्या जात आहेत. यावर तत्काळ अंकुश बसवण्यात यावा.
विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात दरवर्षी लाखो विद्यार्थी हे देश-परदेशांतून येतात. हे तस्कर विद्यार्थ्यांना हेरून अमली पदार्थांची विक्री करत आहेत. यामुळे युवा पिढी ही व्यसनाधीन होत आहे, असे भानगिरे यांनी म्हटले आहे.





