केडगाव- यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचा फटका गुऱ्हाळ घरे आणि कारखान्यांना चांगलाच बसला आहे. त्यामुळे सर्वत्रच उसाची कमतरता निर्माण झाली आहे. यामुळे केडगाव आणि परिसरासह जिल्ह्यातील अनेक गुऱ्हाळघरांना उसाचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे सद्यस्थितीला गुऱ्हाळघरे बंद अवस्थेत असलेली पहावयास मिळत आहेत. दौंड तालुका हा ऊस पिकांचे आगार म्हणून ओळखला जातो. यंदा सर्वत्रच झालेला पाऊस आणि तालुक्याच्या पश्चिम, दक्षिण आणि पूर्व भागात पाणी उपलब्ध असल्याने तालुक्यातील शेतकरी नेहमीच या ठिकाणी ऊसाचे पीक घेत आला आहे. त्यामुळे याभागात एक सहकारी आणि तीन खासगी साखर कारखाने आहेत. सध्यस्थितीतील गुळाचे दर पाहता एक टन गुळामागे शेतकऱ्यांना 1 हजार रूपये मिळणेही अवघड होऊन बसले आहे. मशागत, उसाची लागवड, पाणी, विजेचा प्रश्न आणि येणारे बील अथवा पाणीपट्टी, खतांचा खर्च आणि या सर्वानंतर तोडणी, वाहतूक खर्च पाहता टनामागे दोन हजाराहून अधिक खर्च येतो. याशिवाय गुळ निर्मितीनंतर बाजारपेठेपर्यंतचा प्रवास वेगळाच आहे. मात्र अशा स्थितीत केवळ गुळासाठी केली जाणारी ऊस शेती न परवडणारी झाली आहे. या परिसरात तीन कारखाने असले तरी पूर्वी ऊस शिल्लक राहत असे, त्यामुळे मागील काही दिवसांपासून या ठिकाणी काही स्थानिक आणि परप्रांतीय नागरिकांनी मोठी गुंतवणूक करून गुऱ्हाळे सुरू केली आहेत. गुऱ्हाळ घरांवर काम करणारे मजूर हे बहुतांशवेळा परजिल्ह्यातील असतात. अगोदरच खर्च आणि दर यांचा ताळमेळ लागत नसलेला गुळ धंदा अक्षरश: बंद करावा लागत आहे. आजपर्यंत त्या गुऱ्हाळघरांना मुबलक ऊस उपलब्ध होत होता. परंतु मागील चार वर्षापासून पाऊस कमी झाल्यामुळे पाण्याची कमतरता निर्माण झाली आणि शेती पिकवणे जिकीरीचे बनले आहे. परिणामी सर्वत्रच कारखाने आणि गुऱ्हाळ घरांना घरघर लागली. ऊसाचे क्षेत्र कमी झाले पुरवठा कमी झाल्यामुळे बाजारभाव भडकले पर्यायाने मोठी गुंतवणूक करून व्यवसाय करणाऱ्या परप्रांतीय गुऱ्हाळ मालकांना हा व्यवसाय परवडत नसल्याने त्यांनी गुऱ्हाळे बंद ठेवणे पसंद केले. तोटा सहन करण्यापेक्षा व्यवसाय न केलेला बरा असा उद्देश ठेऊन सद्यस्थितीला केडगाव आणि परिसरातील अनेक गुऱ्हाळे बंद असल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत. सध्यस्थिती परराज्यातून येणाऱ्या साखरमिश्रीत गुळामुळे गुणवत्तापूर्ण गुळावर संक्रात निर्माण आली आहे. दर्जेदार गुळाच्या एका आदणासाठी सुमारे 800 ते 900 लिटर उसाचा रस लागतो. त्यामुळे असा गुळ निर्माण करण्यासाठी सुमारे 1700 ते 1800 रूपयांच्या आसपास खर्च येतो. – गुऱ्हाळ मालक, केडगाव. उत्पन्न व ऊस कमतरतेचा मेळ बसेना दिवसेंदिवस वाढणाऱ्या उत्पन्नातील तफावत आणि ऊसाची कमतरता यांचा न जुळणारा मेळ यासह अन्य काही कारणांमुळे जिल्ह्यातील गुऱ्हाळघरांना अखेरची घरघर लागली आहे. सध्यस्थितीत ऊस तोडणी, वाहतूक, गुळ निर्मिती आणि त्यानंतर बाजारपेठेपर्यंतची गुळाची वाटचाल पाहता येणारा सर्व खर्च शेतकऱ्यांना परवडत नसल्यामुळे शेतकरीही गुऱ्हाळ घरांकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.