J. P. Nadda : कोविडच्या लशीमुळे जीवाला धोका नाही; केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांची संसदेत माहिती

नवी दिल्ली : देशात करोना काळानंतर तरुणांचे अचानकपणे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले होते. हे मृत्यू कोविडच्या लसीकरणामुळे होत असल्याची चर्चा होती. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी राज्यसभेत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. कोविडच्या लशीमुळे तरुणांच्या जीवाला धोका नाही. जनजागृतीसाठी सरकार सोशल मीडियाचा वापर करत आहे, अशी माहिती त्यांनी राज्यसभेत दिली.
केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा म्हणाले, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) केलेल्या संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, कोविड लसीमुळे भारतातील तरुणांमध्ये अचानक मृत्यूचा धोका वाढला नाही. याउलट त्याची भीती कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. करोनामुळे साथीच्या आजारामुळे, आधीच्या हॉस्पिटलायझेशनमुळे अचानक मृत्यूचा कौटुंबिक इतिहास आणि काही जीवनशैलीमुळे मृत्यूचा धोका वाढतो, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने गेल्या वर्षी मे-ऑगस्ट दरम्यान 19 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 47 रुग्णालयांमध्ये अभ्यास केला होता. या विश्लेषणात एकूण 729 आकस्मिक मृत्यूची प्रकरणे आणि 2916 समाविष्ट आहेत. असे आढळून आले की, करोना लसीचा कोणताही डोस घेतल्याने अस्पष्ट अचानक मृत्यूचा धोका कमी होतो. कोविड-19 लसीचे दोन डोस घेतल्याने अशा मृत्यूचा धोक्याची शंका कमी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयसीएमआरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजीने 18 ते 45 वयोगटामधील अशा लोकांवर अभ्यास केला. हा संशोधनात 19 राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 47 रुग्णालयात करण्यात आला. यावेळी 729 नमुने घेण्यात आले ज्यामध्ये अचानक मृत्यू झाला होता. 2916 नमुने असे होते ज्यांना हृदयविकाराच्या झटक्यानंतरही वाचवण्यात आले होते.
या संशोधनात समोर आले की, कोविड 19 लसीची कमीत कमी 1 किंवा 2 डोस घेतल्याने विना कोणत्या कारणाशिवाय अचानक मृत्यू होण्याची शक्यता कमी आहे. संशोधनात अचानक मृत्यूचा धोका वाढवणारे अनेक घटकदेखील समोर आले आहेत. यामध्ये मृत व्यक्तीचे रुग्णालयात दाखल करणे, कुटुंबातील एखाद्याचा अचानक मृत्यू, मृत्यूच्या 48 तास आधी अधिक मद्यपान करणे, अंमली पदार्थांचे वापर आणि मृत्यूआधी 48 तासांत जास्त शारीरिक हालचाली यांचा समावेश आहे.





