करोना संसर्गाला अटकाव करणारे ‘कोविड ऑन आयोडिन’

तळेगाव येथील डॉक्‍टरांचा दावा : जगातील मुख्य प्रबंधांच्या आधारे केले संशोधन

तळेगाव दाभाडे – करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाला “ब्रेक’ लावण्यासाठी तळेगावमधील तीन डॉक्‍टरांच्या पथकाने जागतिक संशोधन, प्रबंधांचा अभ्यास करून प्रतिबंधात्मक “कोविड ऑन आयोडिन’ची निर्मिती केली आहे.

“कोविड ऑन आयोडिन’मुळे विषाणूच्या वाढत्या संसर्गाला अटकाव होतो, असा दावा तळेगाव येथील डॉ. मुबारक खान आणि डॉ. सपना परब यांनी दै. प्रभातशी बोलताना केला आहे. “कोविड’ विषाणूचाच नव्हे, तर कोणत्याही संसर्गाला रोखण्याची ताकद या औषधांमध्ये असल्याचेही डॉ. खान यांनी स्पष्ट केले आहे.

जागतिक पातळीवर करोना विषाणूने धुमाकूळ घातलेला आहे. या विषाणूचा प्रसार हा मुख्यत: बोलणे, खोकणे, शिंकणे यातून तयार होणाऱ्या “ड्रॉपलेट’ व “एरोसोल’मुळे हवेतून होतो. म्हणून अतिशय वेगाने पसरणारा हा विषाणू आहे. आजपर्यंत या विषाणूवर कोणतेही औषध व लस तयार झालेले नाही. याचा प्रसार रोखण्यासाठी चेहऱ्यावर मास्क आणि “फेस शिल्ड’चा वापर होत आहे. विविध पातळीवर अनेक उपाय शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत. अशाच एका प्रयत्नाचा भाग म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून अनेक वर्षांपूर्वी प्रकाशित झालेले प्रबंध वाचून तळेगाव येथील डॉ. मुबारक खान आणि डॉ. सपना परब यांनी सोपा, असा उपाय करोनाचा प्रसार रोखण्यासाठी शोधला आहे. डॉ. मंदार परांजपे यांनी एका प्रबंधाचा आधार घेवून याबद्दल पुढे संशोधन करण्याचे सुचवले.

साधारण 10 टक्‍के पोविडीन आयोडीन हे मागील एक शतकापासून सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांमध्ये जंतूनाशक म्हणून त्वचेवर वापरले जाते. तसेच ते 2 टक्‍क्‍यांमध्ये गार्गलमधून ही उपलब्ध आहे.
शेकडो प्रबंधाचा संदर्भ घेवून डॉ. मुबारक खान यांनी 10 टक्‍के पोवोडीन आयोडीनपासून अत्यंत सौम्य असे 0.5 टक्‍के द्रावण तयार केले. या द्रावणाचा वापर वेगवेगळ्या विषाणूंना निष्क्रिय करण्यासाठी केला गेला आहे.

आजच्या घडीला हे 0.5 टक्‍के द्रावण बाजारात उपलब्ध नाही. डॉ. सपना परब यांनी 0.5 टक्‍के द्रावणाचा वापर रोज कित्येक रुग्णांमधून करतात. याचा शोध निबंध अमेरिकन जर्नलने नुकताच प्रकाशित केला. या 0.5 टक्‍के पोवोडीन आयोडीनने करोनापासून पूर्णतः मुक्‍ती मिळते, असा दावा डॉ. खान, डॉ. परब आणि डॉ. परांजपे यांनी केलेला नाही. तसेच याचा वापर हा फक्‍त नाक आणि घशामार्फत विषाणूचा प्रसार कमी करण्यासाठी करावा, असे आवाहन डॉ. मुबारक खान यांनी केले आहे.

विषाणू हा नाक व घसा येथे प्रामुख्याने जास्त प्रमाणात आढळतो. 0.5 टक्‍के पोवोडीन, आयोडीन, गार्गल व नाकाचे ड्रॉप वापरल्याने विषाणूचा भार कमी होऊन त्याचा प्रसार मंदावण्यामध्ये मदत होऊ शकते. बाधित रुग्ण तसेच प्रत्येकजण याचा वापर करू शकतात, असा दावाही डॉक्‍टरांच्या पथकाने केला आहे. हे संशोधन हे अमेरिकन कान, नाक, घसा जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेले आहे, असे डॉ. खान, डॉ. परब, डॉ. परांजपे यांनी सांगितले.

आमच्या रुग्णालयात दररोज 50-60 पेशंट तपासणीसाठी येतात. आम्ही प्रत्येक रुग्णास “कोविड ऑन आयोडिन’ देतो. या औषधामुळे करोना नष्ट होत नाही, मात्र वाढता संसर्गाला अटकाव निश्‍चतपणे घातला जातो. एखादा रुग्ण पॉझिटिव्ह असेल, तर त्याचा प्रादुर्भाव रोखला जातो. या औषधांमुळे ऍलर्जी होत नाही, त्याचे साइड इफेक्‍ट नाहीत.

– डॉ. मुबारक शेख

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.