सातारा – खटाव तालुक्यातील मायणी येथील मेडिकल कॉलेजमध्ये कोविड हेल्थ सेंटर सुरु करण्यात आले असून जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांवर उपचारही सुरु करण्यात आले आहेत. आमदार जयकुमार गोरे यांच्या परिश्रमातून आणि संकल्पनेतून अद्ययावत हॉस्पिटलमध्ये सुसज्ज कोविड वॉर्ड तयार करुन मेडिकल आणि पॅरामेडिकल स्टाफ सज्ज ठेवण्यात आला आहे. दुष्काळी खटाव तालुक्यात अद्यावत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरु झाल्याने ग्रामीण भागातील रुग्णांच्या अडचणी दूर झाल्या आहेत. जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनावरील ताण वाढला आहे. सातारा व कराड येथे कोविड उपचार केंद्रात बेड उपलब्ध होणेही मुश्कील झाले आहे. जिल्ह्यातील विलगीकरण कक्षही हाऊसफुल्ल झाले आहेत. मायणी येथील छ. शिवाजी एज्यूकेशन सोसायटीच्या रुरल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद रिसर्च सेंटर अँड हॉस्पिटल तसेच इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटरमध्ये सुरुवातीला कोविड संशयितांसाठी क्वारंटाईन वॉर्ड तयार करण्यात आला होता. आयसीयू वॉर्डही सज्ज ठेवण्यात आला होता. जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि संस्थेचे अध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांची सातारा येथे गेल्या आठवड्यात बैठक झाली. मायणी मेडिकल कॉलेजमध्ये कोविड हेल्थ सेंटर सुरु करण्याचा निर्णय त्या बैठकीत घेण्यात आला. आ. जयकुमार गोरे, संस्थापक डॉ. एम. आर. देशमुख, सचिव सोनिया गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुसज्ज कोविड वॉर्ड तयार करण्यात आला. मेडिकल आणि पॅरामेडिकल स्टाफही सज्ज ठेवण्यात आला. प्रांत अश्विनी जिरंगे, तहसीलदार अर्चना पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनुस शेख आणि प्रशासनाच्या सहकार्याने करोनाबाधित रुग्णांवर मायणी मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु करण्यात आले. सध्या येथे करोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ग्रामीण भागातील जनतेला सर्व आरोग्य सुविधा एकाच ठिकाणी मिळण्यासाठी मायणी मेडिकल कॉलेजमध्ये सीटीस्कॅन, डायलिसिस, एमआरआय, कॅथलॅब अशा सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. माण, फलटण, खटावसह सातारा, सांगली जिल्ह्यातील जनतेला या हॉस्पिटलच्या सुविधेचा लाभ मिळणार आहे. सुसज्ज हॉस्पिटलचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले …. माझ्या मतदारसंघातील जनतेला चांगली वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून माझे प्रयत्न सुरु होते. त्यासाठी 500 बेडचे सुसज्ज हॉस्पिटल उभारण्याचा माझा मानस होता. मायणी मेडिकल कॉलेजमध्ये आम्ही मोठ्या परिश्रमाने अद्ययावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. डायलिसिस, सीटीस्कॅन, एमआरआय तसेच ह्रदय रुग्णांसाठी कॅथलॅब अशा सर्व सुविधा या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होत आहेत. एकाच वेळी 500 रुग्णांवर उपचार होणारे हॉस्पिटल साकारण्यात आले याचे समाधान आहे. – जयकुमार गोरे (आमदार, माण- खटाव)