नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांच्यावर दोन मतदारसंघांमधील मतदार याद्यांमध्ये स्वत:चे नाव नोंदवल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावरून दिल्लीतील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने सुनीता यांना आरोपी म्हणून समन्स बजावले आहे. भाजपचे नेते हरीष खुराना यांनी सुनीता यांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला. दिल्लीतील चांदणी चौक आणि उत्तरप्रदेशातील साहिबाबाद अशा दोन विधानसभा मतदारसंघांमधील मतदार याद्यांत त्यांचे नाव समाविष्ट आहे. दोन ठिकाणी मतदार म्हणून नाव नोंदवण्याची कृती लोकप्रतिनिधित्व कायद्यातील तरतुदींचा भंग करणारी आहे, असे तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे. त्या प्रकरणी न्यायालयाने सुनीता यांना 18 नोव्हेंबरला हजर होण्यास सांगितले आहे. लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार कुठल्याही मतदाराला एकाच मतदारसंघात नाव नोंदवता येते. त्या नियमाचे उल्लंघन गुन्हा ठरतो. त्या गुन्ह्याबद्दल जास्तीत जास्त दोन वर्षे तुरूंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. संबंधित प्रकरणावरून राजकारण तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.