Pune News : गजा मारणेला न्यायालयाचा दणका! ‘त्या’ गुन्ह्यातील जामीन अर्ज फेटाळला

Court rejects Gaja Marne’s bail application ; १९ फेब्रवारी या दिवशी कोथरूड भागात राहणाऱ्या आयटी कर्मचारी देवेंद्र जोग यांना गजा मारणे टोळीतील सराईतांनी बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार मकोका दाखल गुन्ह्यात आरोपी गजा मारणेचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी हा आदेश दिला. दरम्यान, या प्रकरणी गजा मारणे, रूपेश मारणेसह एकूण दहा आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यास 30 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
या गुन्ह्यात गजा मारणेला येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात नेत असताना वाटेत सातऱ्यातील एका ढाब्यावर मटन पार्टी करण्यात आली होती. या प्रकरणी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबणाची कारवाई केली. तसेच बाळकृष्ण उर्फ पांड्या लक्ष्मण मोहिते, प्रदीप कंधारे, सतीश उर्फ आबा सुधाकर शिळीमकर व विशाल विलास धुमाळ हे मारणेला भेटायला आले होते. त्यांच्यावरही पोलिसांकडून कारवाई करण्यात आली असून यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात गजानन मारणेने जामीन मिळण्यासाठी ॲड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत विशेष न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला.
मकोका अंतर्गत कारवाई
कोथरूडमधील भेलकेनगर येथे १९ फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी गजा मारणे टोळीतील सराईतांनी आयटी अभियंता देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण केली होती. या घटनेची गंभीर दखल घेत गजा मारणेसह रुपेश मारणे, ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू, किरण कोंडिबा पडवळ, अमोल विनायक तापकीर, सर्व रा. शास्त्रीनगर, बाब्या उर्फ श्रीकांत संभाजी पवार, रा. वडगाव रासाई, शिरूर, या सहा जणांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली.




