फारूक अब्दुल्ला यांना न्यायालयाचा दिलासा; ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्दबातल ठरवला

श्रीनगर : जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने बुधवारी माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांच्या विरोधात ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्दबातल ठरवला. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) या पक्षाचे प्रमुख असणाऱ्या अब्दुल्ला यांना दिलासा मिळाला आहे. जम्मू-काश्मीर क्रिकेट संघटनेतील कथित आर्थिक अनियमिततांच्या आरोपावरून अब्दुल्ला प्रथम सीबीआयच्या रडारवर आले.
संघटनेच्या ४३ कोटी रूपयांहून अधिक निधीची अफरातफर केल्याच्या आरोपावरून सीबीआयने २०१८ यावर्षी अब्दुल्ला आणि इतर काही जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले. त्याआधारे ईडीने मनी लॉण्डरिंगचा गुन्हा दाखल केला. तसेच, आरोपपत्रही दाखल केले. त्या प्रकरणी अब्दुल्ला आणि इतरांची २१ कोटी रूपये किमतीची मालमत्ताही जप्त करण्यात आली.
आता न्यायालयाने ईडीने दाखल केलेले आरोपपत्रही फेटाळले आहे. संबंधित निर्णय देताना न्यायालयाने ईडीला फटकारले. सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्राचा विचार करता मनी लॉण्डरिंगचा गुन्हा घडल्याचे आढळत नसल्याचे दिसते, अशी टिप्पणी न्यायालयाने केली. त्यामुळे ईडीने दाखल केलेल्या प्रकरणी तरी अब्दुल्ला यांना दिलासा मिळाल्याचे सूचित होत आहे.





