Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना न्यायालयाचा मोठा दिलासा

नाशिक : राज्याची कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यासंदर्भात न्यायालय उद्या निर्णय घेणार असल्याचे कोकाटे यांच्या वकिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. त्यामुळे आता कोकाटे यांची आमदारकी जाणार की राहणार? याबाबत उद्या निर्णय होणार आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाकडून सध्यातरी त्यांच्या जामीनाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.
या संदर्भात कोकाटे यांचे वकील अविनाश भिडे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की, अपील प्रकरण संपेपर्यंत शिक्षेला स्थगिती मिळाली आहे आणि जामीन मिळाला आहे. दोन वर्षांच्या अपात्रतेचा जो प्रश्न आहे, त्यावर न्यायालय उद्या निर्णय देणार आहे. त्यासंबंधी सरकारी वकील हे उद्या आपली बाजू मांडणार असल्याचेही भिडे यांनी सांगितले.
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मात्र, नियमानुसार विधानसभा अध्यक्षांकडून अद्याप त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आलेली नाही. याविषयी विरोधकांनी टीकेची झोड उठवल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळताच या प्रकरणी कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान, काँग्रेस नेत्यांवर अशा प्रकरणात यापूर्वी अवघ्या 24 तासांत कारवाई करण्यात आली होती असा आरोपही केला जात आहे. या संदर्भात आता न्यायालयाने कोकाटेंना दिलासा दिला आहे.





