उदयनराजे भोसले यांचा विश्वास
कोपर्डे हवेली – कराड उत्तरच्या विद्यमान आमदारांनी सहकाराच्या नावाखाली लोकांना झुलवत ठेवण्याचे काम केले आहे. जनतेच्या विकासापेक्षा त्यांनी स्वत:चा विकास साधला असून जनताच आता निष्क्रीय आमदारांची घराणेशाही मोडून काढेल. कराड उत्तरचे उद्याचे आमदार धैर्यशील कदम हेच असतील, असा विश्वास उदयनराजे यांनी व्यक्त केला.
कोपर्डे हवेली, ता. कराड येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. धैर्यशील कदम, जितेंद्र पवार, हिंदूराव चव्हाण, रामकृष्ण वेताळ, समृद्धी जाधव, प्रकाश पाटील, सयाजीराव पाटील, सचिन नलवडे, सागर शिवदास उपस्थित होते.
उदयनराजे भोसले म्हणाले, आमदार मीच, साखर कारखान्यावर चेअरमन मीच, नगपालिकेत माझाच भाऊ, बॅंकेचा चेअरमन भाऊ, पतसंस्थेचा चेअरमन भाऊ, शिक्षण संस्थेचा सचिवही भाऊच, पुतण्या नगरसेवक. सगळीकडे मी आणि माझेच कुटुंबीय हे असे किती दिवस चालणार? सत्तास्थानांना धरुन बसलेल्यांना उचलून फेकण्याची वेळ आता आली आहे. धैर्यशील कदम म्हणाले, 2014 च्या निवडणुकीत कॉंग्रेसकडून लढलो. परंतु एकही वरिष्ठ नेता प्रचाराला आला नाही. आज भ्रष्ट राष्ट्रवादीचा कॉंग्रेसला पुळका आला आहे. नाकर्त्या आमदारांना परत संधी देण्याचे षडयंत्र रचले जात आहे. ज्यांनी माझ्यासोबत यापूर्वी काम केले. त्यांनी स्वतःचा स्वाभिमान विकला नाही. उत्तरेत परिवर्तन झाले पाहिजे, या भावनेतून सर्वजण माझ्यासोबत आहेत.