Satara | देशी गाईच्या पालनाला मिळाली गांडूळ प्रकल्पाची जोड

यशवंतनगर, (वार्ताहर) – कोपर्डे हवेली ता. कराड येथील दादासाहेब चव्हाण व युवराज चव्हाण या बंधूंचा देशी गाई व गांडूळ खत प्रकल्प परिसरातील युवा शेतकऱ्यांना दिशादर्शक ठरत आहे.
लहरी वातावरणामुळे शेती उद्योग तितकासा फायदेशीर ठरत नसल्याने युवक वर्ग शेतीपासून दुरावत असताना कोपर्डे हवेलीत या चव्हाण बंधूंनी राबवलेली सेंद्रिय शेती व गांडूळ खत प्रकल्प फायदेशीर ठरत आहे.
दिवंगत वसंत मास्तर फार्मला अनेक शेतकऱ्यां बरोबर विविध संस्थेचे पदाधिकारी भेटी देत आहेत. नुकतेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम पाटणकर यांनी भेट देऊन या प्रकल्पाची माहिती घेऊन चव्हाण बंधूंची प्रशंसा केली.
यावेळी पाटण भाजपा तालुकाध्यक्ष नंदकुमार सुर्वे, शेतकरी अंकुश साळुंखे, सुर्यकांत डुबल, रविंद्र यादव व दादासाहेब चव्हाण आदि उपस्थित होते.
दादासाहेब चव्हाण म्हणाले, सध्या रासायनिक खतापेक्षा सेंद्रिय शेतीची गरज आहे. त्यासाठी मी आणि माझे बंधू युवराज शेतीला पुरक व्यवसाय म्हणून देशी गाई पालन करत असतो.
लाहान मोठ्या गाईंची संख्या तीस आहे. त्यापासून गांडूळ खत, दूध, तूप, गोमूत्र यांची विक्री होते तसेच माझ्या शेतीला रासायनिक खता ऐवजी गांडूळ खताचा वापर करतो शिल्लक राहिलेले खताची विक्री करतो त्याला चांगली मागणी आहे.
पाटणकर म्हणाले, शासनाच्या माध्यमातून गोपालनाला अनुदान आहे त्याचा फायदा नक्कीच घ्या. मी स्वतः शेतकरी आहे. लवकरच गांडूळ खत तयार करणार आहे.


