दोन्ही मतदार संघातील मोजणी बालेवाडीतच

पिंपरी – मावळ आणि शिरुर लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले असून दोन्ही मतदारसंघातील ईव्हीएम मशीन बालेवाडी क्रीडा संकुलातील स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. दोन्ही स्ट्रॉंग रुम त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेने वेढले आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारितील केंद्रीय राखीव पोलीस दल,राज्य राखीव पोलीस दलाचा पहारा आणि त्यानंतर राज्य पोलिसांचा या परिसरात वेढा आहे. या शिवाय चारही बाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशीनची वाहतूक खुल्या वाहनातून न करता बंदिस्त असलेल्या कंटेनरमधून करावी. तसेच वाहनावर जीपीएस यंत्रणा बसवण्यात यावी, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार सर्व विधानसभा मिळून जवळपास 26 कंटेनरचा उपयोग करण्यात आला आहे. या सर्व कंटेनरवर जीपीएस यंत्रणा होती. तसेच सीआरपीएफच्या सुरक्षा कवचात ते बालेवाडीतील क्रीडा संकुलात पोचवण्यात आले आहेत. सर्व कंटेनर आल्यावर त्यातील ईव्हीएम काढून ते स्ट्रॉंग रुममध्ये बूथनिहाय लावून घेण्यात आले. ही प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालली. यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी स्वत: हजर होते.

यासोबतच सर्व विधानसभा मतदारसंघांचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या देखरेखीखाली सर्व ईव्हीएम व्यवस्थित ठेवून स्ट्रॉंग रुमची सुरक्षा सीआरपीएफकडे सोपविण्यात आली आहे. ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय सुरक्षितपणे रात्रभर सुरु होती. मतदान संपल्यानंतर सर्व ईव्हीएम मशीन या त्यांच्या – त्यांच्या विधानसभानिहाय स्ट्रॉंग रूममध्ये आणण्यात आल्या. त्यानंतर प्रत्येक विधानसभानिहाय तेथून गेलेल्या ईव्हीएम, परत आलेल्या ईव्हीएम याची मोजणी झाली. सर्व व्यवस्थित असल्याचे स्पष्ट झाल्यावर प्रत्येक बुथनिहाय ईव्हीएम मशीन कंटेनरमध्ये व्यवस्थित लावून सील बंद करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया चालत होती. इतकेच नव्हे तर ज्या स्ट्रॉंग रुममध्ये ईव्हीएम ठेवण्यात आले आहेत, त्याठिकाणी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कुठल्याही प्रकारची “लाईव्ह वायरिंग’ नाही. संपूर्ण गोदाम हे अंधारात असणार आहे. आतमध्ये कुठल्याही प्रकारची “लाईट’सुद्धा लावण्यात आलेली नाही.

बालेवाडीतील ज्या स्ट्रॉंग रुममध्ये अथवा परिसरात कुणालाही जाण्याची परवानगी नाही. परंतु लोकसभा निवडणुकीतील उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना ईव्हीएमच्या सुरक्षित आहेत किंवा नाही, याचा आढावा घ्यायचा असेल तर त्यांना ते पाहता येऊ शकेल. परंतु त्याची रितसर परवानगी घेणे आवश्‍यक आहे. त्यासाठी येथे एक लॉग बुक सुद्धा ठेवण्यात आलेले आहे. सर्व टप्प्यातील निवडणुका पार पडल्यानंतर 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे. मावळ आणि शिरुर लोकसभा निवडणुकीतील मतमोजणी बालेवाडीतील क्रीडासंकुल परिसरातच होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.