Raj Thackeray : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली असून, मोठ्या उत्साहात मतदानाची प्रक्रिया पार पाडली जात आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली. या निव़डणुकांसाठी २ डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबरला मतमोजणी करण्यात येणार होती. पण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २ डिसेंबर आणि २० डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाची मतमोजणी एकाच दिवशी एकत्रितपणे म्हणजेच २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचा मोठा निर्णय घेतला. न्यायालयाने घेतलेल्या या निर्णयावर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. आता या निर्णयावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी चार शब्दांत पहिली प्रतिक्रिया देत विषय संपवला आहे. देशात मनमानी सुरु आहे, अशा शब्दांत राज ठाकरेंनी निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री काय म्हणाले? निवडणूक आयोगाने प्रक्रियेत सुधारणा करावी ही अतिशय चुकीचे घडले आहे, अशा पद्धतीने निवडणुका पुढे जाणे हे यंत्रणेचे अपयश असल्याची पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. कुणीतरी कोर्टात गेले म्हणून पुढे निवडणुका ढकलेले योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. घोषित केलेल्या निवडणुका त्यांचे निकाल पुढे चाललेले आहेत. मला असं वाटत की एकूणच ही पद्धत फार योग्य नाही. नागपूर खंडपीठाने दिलेला निकाल मान्य करावा लागेल. पण यातून जे उमेदवार आहेत, मेहनत करतात. त्यांचा भ्रमनिरास होतो. मला वाटतं हे योग्य नाही. अशा खूप निवडणुका राज्य निवडणूक आयोगाला घ्यायच्या आहेत, या सगळ्या प्रक्रियेत निवडणूक आयोगाने सुधार आणला पाहिजे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाला सुनावले. हेही वाचा : दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा खुलासा : दहशतवादी दानिशच्या फोनमधून महत्वाचे पुरावे हाती