पिंपरी – मागील काही दिवसांपासून देशभरामध्ये “करोना’ विषाणू संसर्गामुळे हाहाकार उडाला आहे. या विषाणूचा प्रसार महाराष्ट्रसह पुणे, पिंपरी चिंचवड शहरामध्ये देखील झाला आहे. देशामध्ये सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रामध्ये सापडले आहेत. “करोना’ विरुद्धच्या लढ्याला नैतिक आणि अर्थिक बळ देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंगेसच्या सर्व नगरसेवकांचे मानधन मुख्यमंत्री साहय्यता निधीला देण्यात येणार आहे.
“करोना’ बाधितांवर राज्य सरकार व मनपाच्या वैद्यकीय विभागाकडून उपचार सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशामध्ये संचारबंदी लागू केली आहे. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. यामुळे राज्यातील उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. “करोना’चे संकट आणि टाळेबंदीमुळे राज्याच्या आर्थिक उत्पन्नात झालेली घट लक्षात घेऊन “करोना’ विरुद्धच्या लढ्याला नैतिक आणि अर्थिक बळ देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंगेसच्या सर्व नगरसेवकांचे मानधन मुख्यमंत्री साहय्यता निधीला देण्यात येणार आहे. यासंदर्भात पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.
राष्ट्रवादीकडून आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेतील पक्षीय बलाबलनुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे 36 नगरसेवक असून 2 नामनिर्देशित सदस्य असे एकूण 38 नगरसदस्य आहेत. या 38 नगरसदस्यांचे मार्च महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात येणार आहे. त्यांच्या एकत्रित रकमेचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.