Cough Syrup Racket : कोडीनयुक्त कफ सिरपच्या बेकायदेशीर पुरवठ्याशी संबंधित रॅकेटप्रकरणी (Cough Syrup Racket) 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर असलेल्या मेडिकल स्टोअर ऑपरेटरला कानपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. ही कारवाई अनेक महिन्यांच्या देखरेखीनंतर करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली. सुमित केसरवानी (रा. देवनगर, रायपूरवा) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याविरुद्ध गेल्या वर्षी गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार होता. पोलिस उपायुक्त (गुन्हे शाखा) श्रवण कुमार सिंह यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, १२ ऑक्टोबर रोजी देवनगर येथील बालाजी मेडिकल स्टोअरवर ड्रग इन्स्पेक्टरच्या उपस्थितीत संयुक्त छापा टाकण्यात आला होता. त्यावेळी कोडीन-आधारित कफ सिरप (फेनिपिक-टी) आणि अल्प्राझोलम गोळ्यांच्या २,१०० बाटल्या वैध कागदपत्रांशिवाय साठवलेल्या अवस्थेत जप्त करण्यात आल्या. पुढील तपासात केसरवानीने बनावट बिलिंग व कागदपत्रांच्या आधारे ५५,६७१ कोडीन सिरपच्या बाटल्या आणि १.२ लाखांहून अधिक अल्प्राझोलम गोळ्या खरेदी केल्याचे उघड झाले. डिजिटल पुरावे नष्ट करून तपासात अडथळा आणण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीने सुमारे ७४ मेडिकल स्टोअर्सना सिरपचा पुरवठा केल्याचा आरोप आहे. ४५-४८ रुपयांना खरेदी केलेले सिरप १५०-१६० रुपयांना विकले जात होते. औषधे लखनौस्थित इंडिका लॅब सायन्सेसकडून मिळाल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी बीएनएस आणि एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.