Nevasa News : कापूस आयात शेतकऱ्यांवरील महासंकट : कृषी शास्रज्ञ डॉ.अशोकराव ढगे यांचा दावा!

नेवासा : जगामध्ये चीन, भारत, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका हे चार देश कापूस पिकविणारे मुख्य आहेत. ऑस्ट्रेलियामधील कापूस उत्पादन मर्यादित होते, त्यामुळे त्यांची निर्यात फारशी होत नाही. चीनमध्ये कापसाचे उत्पादन भरपूर असले तरी कापसाची गुणवत्ता ही कमी दर्जाची जागतिक पातळीवर आढळते त्यामुळे त्यांनाही निर्यातीला मर्यादित स्वरूप आहे.
भारतातील कापूस उत्पादन चांगले असून कापसाची प्रत व गुणवत्ता उत्तम असल्यामुळे निर्यातीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अमेरिका देशात गेल्या दशकापासून कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत असून गुणवत्ता चांगली असल्यामुळे निर्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात होते केंद्र सरकारने कापूस आयातीवरील अकरा टक्के शुल्क हटविण्याचा अंतिम आदेश जारी केला आहे. यामुळे अमेरिकेतील कापूस भारतामध्ये येऊ शकतो अमेरिकन सरकारने भारतामध्ये शेतीमाल बाजारपेठ खुली करावी हा दबाव आणलेला होता.
तथापि भारत सरकारने ‘त्या’ दबावाला फारसे अनुकूल प्रतिसाद दिलेला नव्हता भारताने कायमस्वरूपी आदेश जाहीर न करता अंतरिम आदेश कापूस पिकाच्या बाबतीत जाहीर केल्यामुळे कापसाची आयात भारतात होऊ शकते? महाराष्ट्र हा सुद्धा एक कापूस पिकवणारा आघाडीचे राज्य आहे विदर्भ कापसाचे आगार आहे.
महाराष्ट्रात कापसाचा प्रतिक्विंटल उत्पादन खर्च ७००० रुपयांपेक्षा जास्त आहे तसेच कापसाला दिलेली एमएसपी तुटपुंजी असून आजच राज्यातील शेतकरी मेटाकुटीला आल्यामुळे कापूस पिकविणारा शेतकरी आत्महत्या करत आहे त्यामुळे “घरचे झाले थोडे आणि पाहुण्यांनी धाडले घोडे”अशी अवस्था निर्माण झाली असल्याचे स्पष्ट मत कृषी शास्त्रज्ञ डॉ.अशोकराव ढगे यांनी दैनिक प्रभात’शी बोलतांना व्यक्त केले.
या अंतरिम आदेशामुळे अमेरिकेचा कापूस भारतात आला तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर हे एक फार मोठे महासंकट येईल व कापूस उत्पादन करणारा शेतकरी उध्वस्त होईल. त्यामुळे सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन या धोरणाला विरोध करून कापसाचे एम एसपी अधिक २० टक्के वाढविणे आवश्यक आहे.
तसेच एमएसपी पेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे भारतातील टेक्स्टाईल इंडस्ट्री शेतकऱ्यांकडून स्वस्तात कापूस खरेदी करतात व त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होते, याचाही गांभिर्याने विचार करणे आवश्यक आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य धोरण व रास्त भाव आणि कायदेशीर संरक्षण ही काळाची गरज आहे असे स्पष्ट प्रतिपादन कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांनी दैनिक प्रभात’शी बोलतांना केले आहे.
…अन्यथा शेतकरी उध्वस्त होईल
राज्यात अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कापसाच्या उत्पादनात भरीव वाढ करत आहेत त्याला प्रोत्साहन देणे हे देश हिताचे आहे अन्यथा महा संकटातून शेतकरी उध्वस्त होईल असा गंभीर इशाराही कृषी शास्रज्ञ अशोकराव डॉ.ढगे यांनी दिला आहे.

