Coastal Road : वांद्रे-वरळी सी-लिंक कोस्टल रोड आजपासून प्रवासासाठी खुला

मुंबई : कोस्टल रोडचा दक्षिण भाग गुरुवारी वांद्रे वरळी सी लिंकला जोडला जाईल. यावरून वांद्र्यापर्यंत प्रवास करता येणार आहे. यामुळे मरीन ड्राइव्ह ते वांद्रे हे अंतर फक्त 12 मिनिटात पार करता येणार आहे. कोस्टल रोड आणि सी लिंक कनेक्ट झाल्याने वरळीच्या बिंदु माधव चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत या कोस्टल रोडचे उदघाटन करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोस्टल रोड ते सी लिंक या रोडचे उद्घाटन करणार आहेत. बिंदू माधव चौकातून हिरवा कंदील दाखवल्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल. मुंबई कोस्टलरोड रस्ता प्रकल्प (दक्षिण) अंतर्गत उत्तर वाहिनी मार्गिका (चौपाटी ते वरळी) आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू यांना जोडणारा दक्षिणेकडील पुल असा हा कोस्टल रोड आहे. आज रात्रीपासून या नवीन कोस्टल रोडवरुन मुंबईकरांना प्रवास करता येणार आहे.
कोस्टल रोड जवळपास १३ हजार कोटींचा
कोस्टल रोडच्या प्रकल्पातील मुख्य टप्पा असलेला १३६ मीटरच्या पट्टा सर्वांत मोठ्या बोस्टिंग आर्च गर्डरने जोडण्यात आला आहे. दोन हजार मेट्रिक टन वजनाचा महाकाय गर्डर जोडण्यात आला आहे. कोस्टल रोड हा एकूण २९ किमीचा प्रकल्प आहे. एकूण १२ हजार ७२१ कोटी रुपये संपुर्ण प्रकल्प खर्च आहे. यामध्ये १५.६६ किमीचे तीन अंतर्गत रस्ते आणि २.०७ किमीचे दोन बोगदे आहेत.





