पुणे: कॉसमॉस बँकेने दि. १८ जानेवारी २०२६ रोजी १२० वा वर्धापनदिन उत्साहात साजरा केला. बँकेच्या विद्यापीठ रस्त्यावरील मुख्य कार्यालयातील सहकार सभागृहात या निमित्ताने ‘तिळगूळ समारंभाचे’ आयोजन करण्यात आले होते. बँकेचे सभासद, ठेवीदार, खातेदार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला २०२५-२६ या आर्थिक वर्षातील चालू खाते-बचत खाते आणि कर्जपुरवठा यांची विशिष्ट कालावधीसाठी दिलेली उद्दिष्टं ज्यांनी उत्तम कामगिरी करुन पूर्ण केली आहे, अशा सेवकांचा विशेष सत्कार याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष ॲड. प्रल्हाद कोकरे यांच्या हस्ते करण्यात आला. बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ. अपेक्षिता ठिपसे यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी सौ. ठिपसे यांनी बँकेने ४०००० रुपये कोटींचा टप्पा पूर्ण केल्याचे जाहीर केले. सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सीए दिलीप सातभाई यांचे ‘आर्थिक साक्षरता’ या महत्वपूर्ण विषयावर व्याख्यान झाले. सातभाई यांनी आर्थिक जागरुकता व विवेकी गुंतवणूक पध्दतींचे महत्व यावेळी अधोरेखित केले. आजच्या काळात गुंतवणुकीसाठी विविध पर्याय उपलब्ध असताना, सुयोग्य नियोजनाद्वारे आर्थिक स्थैर्य राहण्यासाठी अभ्यासपूर्ण निर्णय घेणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले. सदर समारंभास संचालक मंडळातील सर्व सदस्य व व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे व इतर सदस्य उपस्थित होते. बँकेच्या सह व्यवस्थापकीय संचालिका सौ. आरती ढोले यांनी आभार प्रदर्शन केले. सौ. प्राची घोटकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.