कॉसमॉस बँकेला सर्वोत्कृष्ट सहकारी बँकेचा पुरस्कार प्रदान

पुणे – कॉसमॉस बँकेला सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता सर्वोत्कृष्ट सहकारी बँकेचा पुरस्कार केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मुंबई येथील दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशनची ४५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व पुरस्कार वितरण सोहळा कॉसमॉस बँकेच्या मुख्य कार्यालयात ‘सहकार सभागृहामध्ये’ पार पडला.
कॉसमॉस बँकेस हा पुरस्कार ५,००० रुपये कोटींवरील ठेवी असलेल्या सहकारी बँकांच्या श्रेणीमध्ये प्राप्त झाला. बँकेतर्फे अध्यक्ष सीए मिलिंद काळे, उपाध्यक्ष सीए यशवंत कासार तसेच संचालक मंडळातील सदस्य व व्यवस्थापकीय संचालिका अपेक्षिता ठिपसे यांनी पुरस्कार स्वीकारला. सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
ऑडिटवर्ग, ठेवी आणि कर्जामधील वाढ, ढोबळ तसेच निव्वळ एनपीए, सीआरएआर, सीडीरेशो, ऑपरेटींग व नेट प्रॉफिट अशासारख्या विविध निकषांवर सदर पुरस्कार जाहीर करण्यात आले, यामध्ये कॉसमॉस बँकेने सर्वोत्कृष्ट बँकेचा प्रथम पुरस्कार प्राप्त केला आहे.
यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, “सहकारी बँका हा अर्थव्यवस्थेचा महत्वाचा कणा असून या बँकांच्या समोर असलेल्या अडचणी निश्चितपणे सोडविल्या जातील. नजीकच्या काळात त्यादृष्टीने देशाचे नवे सहकार धोरण जाहीर केले जाईल.”
यावेळी व्यासपीठावर सहकार आयुक्त दीपक तावरे, फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रम्हेचा, उपाध्यक्षा वैशाली आवाडे तसेच कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे, रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे व इतर मान्यवर उपस्थित होते.





