Cosmos Bank: कॉसमॉस को-ऑप बँकेचे वरिष्ठ संचालक श्री सचिन आपटे यांची बँकेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली आहे. माजी अध्यक्ष, ॲड. प्रल्हाद कोकरे यांनी स्वेच्छेने दिलेल्या राजीनाम्यानंतर ही निवड करण्यात आली. संचालक मंडळातील सर्व संचालकांनी श्री आपटे यांच्या अध्यक्षपदासाठी एकमताने मान्यता दिल्यामुळे सदर निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी, पुणे श्री जितेंद्र डूडी यांनी सहकार निवडणूक प्राधिकरण, नवी दिल्ली यांचे मान्यतेनंतर जाहीर केले. श्री आपटे यांनी पुण्यातील नामांकित शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी आणि स्ट्रक्चरल अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. श्री आपटे प्रॅक्टिसिंग सिव्हिल इंजिनिअर असून प्रवर्तक आणि विकासक म्हणून ३० वर्षांहून अधिक काळ भारतात तसेच परदेशात कार्यरत आहेत. विविध संस्था, रुग्णालये आणि ट्रस्टसाठी व्यवस्थापन सल्लागार आहेत. तसेच पुण्यातील नामांकित रुग्णालयांसाठी संपर्क सल्लागार म्हणून काम करतात, त्याचबरोबर हॉस्पिटॅलिटी आणि रेस्टॉरंट उद्योगातील एक यशस्वी उद्योजक आहेत. नामवंत शैक्षणिक संस्थांशी संबंधित असल्याने शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे सक्रिय योगदान आहे. श्री आपटे व्यावसायिक क्षेत्राबरोबरच विविध सामाजिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत. श्री आपटे २०१९ पासून कॉसमॉस बँकेच्या संचालक मंडळावर आहेत. सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षामध्ये त्यांनी बँकेच्या उपाध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. बँकेच्या विविध समित्यांवर श्री आपटे कार्यरत आहेत.