Cosmos Bank: सन 2025-26 या आर्थिक वर्षात कॉसमॉस बँकेने सर्व आघाड्यांवर उत्तम कामगिरी केली आहे. 31 मार्च 2026 अखेर बँकेने रु. 44 हजार कोटींचा व्यवसाय पूर्ण केला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अॅड. प्रल्हाद कोकरे यांनी दिली. लवकरच निवृत्त होणार असलेल्या अॅड. कोकरे यांनी सांगितले की संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेच्या ठेवींमध्ये रु. 3215 कोटींनी वाढ होऊन मार्च 26 अखेर एकूण ठेवी रु. 26122 कोटी तसेच कर्जामध्ये रु. 2151 कोटींनी वाढ होऊन एकूण कर्ज वितरण रु. 17878 कोटींचे झाले आहे. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार रु. 3 कोटींपर्यंतच्या छोट्या कर्जाचे प्रमाण एकूण मंजूर कर्ज मर्यादेच्या 50 % असणे आवश्यक आहे ते बँकेने 52.52 % केले आहे. बँकेच्या व्यवसायामध्ये रु. 5,366 कोटींनी वाढ होऊन एकूण व्यवसाय रु. 44 हजार कोटींहून अधिक झाला. एकूण व्यवसायात 14 टक्के वाढ झाली. मार्च 26 अखेर बँकेच्या ढोबळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाण (ग्रॉस एनपीए) 3.10 % असून नक्त अनुत्पादित कर्जाचे प्रमाण (नेट एनपीए) 0.90 % आहे. (सर्व आकडेवारी लेखापरीक्षणपूर्व आहे.) बँकेने नुकत्याच गुजरात राज्यात एकूण 10 नवीन शाखा सुरू केल्या असून त्यामुळे बँकेच्या गुजरात राज्यात 38 शाखा झाल्या असून 7 राज्यात एकूण 193 शाखा झाल्या आहेत. आगामी काळात दक्षिण भारतात व पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शाखा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती ड. कोकरे यांनी यावेळी दिली.