योगी सरकारकडून कुंभमेळ्यात भ्रष्टाचार; ‘कॅग’च्या अहवालातील दाखल देत ‘आप’चा आरोप

लखनौ – उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने कुंभमेळ्याच्या आयोजनातही भ्रष्टाचार केला आहे ही बाब कॅगच्या अहवालातून स्पष्ट झाली आहे असा दावा आम आदमी पक्षाने केला आहे.
आपचे खासदार संजयसिंह यांनी या संबंधात जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी 2700 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. या रकमेत अनेक अनियमीतता आढळून आल्या आहेत असे कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
कुंभमेळ्यासाठी 32 ट्रक्टर्स खरेदी केले गेले आहेत असे दाखवण्यात आले आहे पण त्यांचे जे वाहन क्रमांक दिले गेले आहेत ते नंबर मोटार कार, मोपेड आणि स्कुटरचे आहेत असे कॅगने म्हटले आहे. राम मंदिर उभारणी असो, कुंभमेळ्याचे आयोजन असो, भाजपच्या नेत्यांनी कोठेही भ्रष्टाचाराची संधी सोडलेली नाही असा आरोप ही संजयसिंह यांनी केला.
उत्तरप्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचारासाठी धर्मकार्याचा तरी अपवाद करायला हवा अशी खोचक सूचनाही त्यांनी केली आहे. कुंभमेळा खर्चाच्या ऑडिट रिपोर्ट मधील अन्य तपशीलही संजयसिंह यांनी दिला आहे.





