कोलकाता – भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे गोत्यात आलेले प. बंगालमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांची मंत्रिपदाच्या जबाबदारीतून तात्काळ मुक्तता करण्यात आली असल्याचे बंगाल सरकारने जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
आपण भ्रष्टाचार अथवा अन्य कोणत्याही चुकीच्या कामाचे कधीच समर्थन करणार नाही. जी व्यक्ती चुकीच्या कामांत दोषी आढळेल त्या व्यक्तीला तात्काळ शिक्षा केली जाईल असे चॅटर्जी यांना अटक करण्याची दोन दिवस अगोदरच प. बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते.
तसेच आपल्या विरोधात जी मोहीम राबवली जाते आहे ती दुर्भाग्यपूर्ण असल्याचेही त्या म्हणाल्या होत्या. सत्य लोकांसमोर आले पाहिजे. मात्र त्यालाही कालमर्यादा असली पाहिजे. जर भारतीय जनता पार्टीला असे वाटत असेल की केंद्रीय यंत्रणांचा वापर करून ते माझा पक्ष फोडू शकतात तर त्यांचा तो चुकीचा समज आहे. कारण असे काही होणार नाही असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, तृणमूलच्या शिस्तपालन समितीची बैठक होणार असून त्यात चॅटर्जी यांची पक्षातल्या सगळ्याच पदांवरून हकालपट्टी करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.