पुणे –महापालिकेच्या अंदाजपत्रकात नगरसेवकांना प्रभागाच्या विकासासाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या वॉर्डस्तरीय निधीतून गेल्या चार वर्षांत सर्व नगरसेवकांनी पावसाळी लाइन तसेच ड्रेनेज दुरूस्तीच्या नावाखाली तब्बल 15 कोटी 31 लाख रुपयांचा खर्च केला आहे. तर, नागरिकांना तब्बल 11 कोटी 57 लाखांच्या ज्यूट बॅगचे वाटप करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे या दोन कामांमध्येच भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे. “परिवर्तन’ या संस्थेच्या वतीने पालिकेच्या गेल्या चार वर्षांतील नगरसेवकांच्या कामगिरीचे “प्रगती पुस्तक’ जाहीर करण्यात आले आहे. यातूनही धक्कादायक बाब समोर आली आहे.
महापालिकेतील नगरसेवकांनी दि. 1 एप्रिल 2017 ते दि. 31 मार्च 2021 या चार वर्षातील केलेल्या कामांचे हे प्रगती पुस्तक संस्थेकडून तयार करण्यात आले आहे. नगरसेवकांनी वॉर्डस्तरिय निधीचा वापर कसा केला, सभागृहातील उपस्थिती किती, मुख्यसभेत कोणी प्रश्न उपस्थित केले, विविध समित्यांवर किती नगरसेवकांना संधी मिळाली तसेच नगरसेवकांवर किती गुन्हे दाखल आहेत. या निकषांवर हे “प्रगती पुस्तक’ तयार करण्यात आले आहे. परिवर्तन संस्थेचे इंद्रनील सदलगे, भक्ती भावे, भरत बनाटे, ओशीम शर्मा, प्रणव जाधव यांच्यासह इतर सदस्यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.
उपस्थितीत “मनसे’ अव्वल…
महापालिकेच्या सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांची सर्वाधिक 83.50 टक्के उपस्थिती आहे. त्या पाठोपाठ सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांची 80.04 टक्के, कॉंग्रेस 77.11, राष्ट्रवादी कॉंग्रेस 71.72, शिवसेना 71.50 टक्के आणि अपक्ष 59.25 टक्के अशी उपस्थिती आहे.
71 नगरसेवक “गप्प’च?
भाजपच्या नगरसेवका गायत्री खडसे यांची सभागृहात सर्वाधीक 95 टक्के उपस्थिती असून भाजप पुरस्कृत अपक्ष नगरसेविका रेश्मा भोसले यांची सर्वात कमी 30 टक्के उपस्थिती आहे. तर पालिकेच्या 162 नगरसेवकांपैकी अवघ्या 109 नगरसेवकांनी शहराबाबत विविध लेखी प्रश्न विचारले असून 71 निवडून आलेल्या नगरसेवकांनी एकही प्रश्न विचारलेला नाही.
चार वर्षांत कोट्यवधींचा चुराडा…
नगरसेवकांनी गेल्या चार वर्षांत कोट्यवधींचा वॉर्डस्तरीय निधी खर्च केला आहे. ड्रेनेज लाइनवर 15 कोटी 31 लाख, ज्यूट बॅग वाटपावर 11 कोटी 57 लाख, करोना कामासाठी 6 कोटी 59 लाख, सफाई-राडारोडा उचलण्यासाठी 5 कोटी 71 लाख, पथदिवे, विद्युत विषयक कामांसाठी 5 कोटी 52 लाखांचा खर्च करण्यात आला आहे. प्रत्येक नगरसेवकाने सरासरी गेल्या चार वर्षात 56 लाख 11 हजारांचा वॉर्डस्तरिय निधी खर्च केला आहे.